बालकामगारांची शोधमोहीम

By Admin | Updated: June 18, 2014 01:44 IST2014-06-17T22:47:57+5:302014-06-18T01:44:38+5:30

जालना : शहरात काही प्रतिष्ठानांवर बालकामगार काम करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या १५ जून रोजीच्या अंकातून प्रसिद्ध होताच कामगार अधिकारी कार्यालयाच्या पथकांनी बालकामगारांची शोध मोहीम सुरू केली आहे.

Child labor search search | बालकामगारांची शोधमोहीम

बालकामगारांची शोधमोहीम

जालना : शहरात काही प्रतिष्ठानांवर बालकामगार काम करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या १५ जून रोजीच्या अंकातून प्रसिद्ध होताच कामगार अधिकारी कार्यालयाच्या पथकांनी बालकामगारांची शोध मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी काही प्रतिष्ठानांची या पथकांकडून तपासणी करण्यात आली. मात्र कारवाईसंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
‘लोकमत’ ने स्टींग आॅपरेशनद्वारे हा प्रकार उजेडात आणला. शहरातील बहुतांश उपहारगृहे, दुकाने, ढाबे, गॅरेज आदी ठिकाणी बालकामगार अक्षरश: ढोर मेहनत करताना आढळून आले होते. शासनाच्या नियमांची ऐसी की तैसी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते.
विशेष म्हणजे बालकामगार विरोधी दिन सरकारी पातळीवर गेल्या आठवड्यातच साजरा करण्यात आला. मात्र त्याचा परिणाम दिसून आला नव्हता.
नवीन व जुना जालना भागात एकूण तीनशेपेक्षा अधिक छोटी-मोठी उपहारगृहे आहेत. यातील काही उपहारगृहांमध्ये १२ ते १५ या वयोगटातील बालकामगारांची संख्या अधिक होती. याबाबतचे छायाचित्रांसह वृत्त प्रकाशित होताच, कामगार अधिकारी कार्यालयाने आपल्या पथकांद्वारे बाल कामगारांची शोध मोहीम हाती घेतली. सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही प्रतिष्ठानांची या पथकांनी तपासणी केल्याचे समजते. विशेषत: बसस्थानक, मामा चौक, महावीर चौक, सुभाष रोड या भागात तपासणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही प्रतिष्ठानांवर ‘येथे बालकामगार नाहीत’ अशा आशयाच्या पाट्या लावलेल्या असतात. परंतु यापैकी काही ठिकाणी बालकामगार काम करताना आढळतात. हा प्रकार सर्वांसमक्ष सुरू असतानाही प्रत्यक्षात संबंधित यंत्रणेकडून काहीच कारवाई होत नाही. (प्रतिनिधी)
शोधमोहीम अखंडित ठेवा
जालना शहरात झोपडपट्ट्यांची संख्या ५५ एवढी आहे. या झोपडपट्ट्यांमधील बालकामगारांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. कामगार अधिकारी कार्यालयाने यापूर्वीही शोधमोहीम राबविली, नव्हे शोधमोहीम ही अखंडितपणे सुरू असते, असे याच कार्यालयाकडून सांगण्यात येते.
ज्या प्रतिष्ठानांमध्ये बालकामगार आढळून येतील, तेथील संचालकांविरुद्ध पोलिस कारवाई करण्यात येईल, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्या दिवशी किती प्रतिष्ठानांची तपासणी केली व किती बालकामगार आढळून आले, हे समजू शकले नाही.

Web Title: Child labor search search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.