नियोजनाअभावी खालावले ‘बालस्वास्थ्य’
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-12T23:57:27+5:302014-07-13T00:17:57+5:30
संजय तिपाले , बीड भावी पिढींच्या आरोग्याची देखभाल घेण्यासाठी सुरु केलेल्या बालस्वास्थ्य कार्यक्रमाचेच ‘स्वास्थ्य’ नियोजनाअभावी खालावले आहे.

नियोजनाअभावी खालावले ‘बालस्वास्थ्य’
संजय तिपाले , बीड
भावी पिढींच्या आरोग्याची देखभाल घेण्यासाठी सुरु केलेल्या बालस्वास्थ्य कार्यक्रमाचेच ‘स्वास्थ्य’ नियोजनाअभावी खालावले आहे. तपासणीसाठी नियुक्त पथक व अंगणवाड्या यांच्यात ताळमेळ नसल्याने ही स्थिती ओढावली आहे. महत्त्वाचे म्हणजे अंगणवाडीतार्इंना बालकांच्या आरोग्याचे मूल्यमापन करण्याचे ‘बेसिक’ प्रशिक्षणच दिले गेले नसल्याची खळबळजनक बाबही पुढे आली आहे.
जिल्ह्यातील २१०३ बालके कुपोषित असून बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या तपासणीतून लाखाहून अधिक बालके सुटल्याने कुपोषित बालकांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. अंगणवाडीताई प्रत्येक महिन्याला बालकांच्या आरोग्याचे मूल्यमापन करतात तर बालस्वास्थ्य तपासणीसाठी नेमलेली ३९ पथके तीन महिन्याला तपासणी करतात. पथकांत बीएएमएस डॉक्टरांचा समावेश आहे; पण अंगणवाडीतार्इंना कुठलेही प्रशिक्षण दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या बालआरोग्याच्या नोंदींवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पूर्वी बालकांच्या वयानुसार त्याचे वजन मोजले जायचे. आता वयानुसार उंची, अंगावरील सूज व दंडघेराचे मोजमाप होते. त्यामुळे आरोग्याच्या मूल्यमापनाची प्रक्रियाच अंगणवाडीतार्इंसाठी किचकट बनली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात एप्रिल ते जून २०१४ या दरम्यान सुमारे १ लाख ६८ हजार २०१ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३५ हजार ३७५ बालकांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. २६३ बालके शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ५१ बालकांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. उर्वरित २१२ बालकांच्या शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत. काही बालकांच्या शस्त्रक्रिया जिल्ह्याबाहेरील दवाखान्यांत कराव्या लागणार आहेत. त्यांना ‘रेफर’ करुन शस्त्रक्रिया करण्याचे कामही रखडले आहे.
उपाययोजना सुरु
बालस्वास्थ्य कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यावर आमचा भर आहे. २१ ठिकाणी ग्रामबालविकास केंद्रे सुरु केली आहेत. तेथे बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. शस्त्रक्रिया रखडल्या असल्या तरी तज्ज्ञांना पाचारण करण्यात येईल किंवा बालकांना रेफर करुन योग्य ते उपचार करण्यात येतील. बालकांचे आरोग्य ठणठणीत रहावे, यासाठी पुरेपूर प्रयत्न असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. नसरुद्दीन पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बालविकास केंद्रांतही हेळसांड !
कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यात २१ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामबालविकास केंद्रे सुरु आहेत. तेथे बालकांना आठवेळा विशेष आहार देऊन त्यांच्या आरोग्याची देखभाल घेऊन बालके सदृढ बनविले जाते. त्यासाठी २१ दिवसांत एका बालकावर ५ हजार २५० रुपये खर्च केले जातात; पण जिल्ह्यातील ग्रामबालविकास केंद्रांमध्ये आठवेळा आहार दिलाच जात नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या कें द्रांत ७५ बालकांची नोंद आहे; पण अनेक पालक आपल्या बालकांना केंद्रात आणत नाहीत की, अंगणवाडीताई किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत असे चित्र आहे.