वीजतार अंगावर पडल्याने बालक भाजला
By Admin | Updated: July 21, 2014 00:27 IST2014-07-21T00:16:41+5:302014-07-21T00:27:19+5:30
पाथरी : कासापुरी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातून नाथरा व जवळा झुटा येथे जाणारी मुख्य विद्युत वाहिनी (तार) एका युवकाच्या अंगावर पडल्याने युवक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना १९ जुलै रोजी घडली.
वीजतार अंगावर पडल्याने बालक भाजला
पाथरी : कासापुरी ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातून नाथरा व जवळा झुटा येथे जाणारी मुख्य विद्युत वाहिनी (तार) एका युवकाच्या अंगावर पडल्याने युवक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना १९ जुलै रोजी सायंकाळाच्या सुमारास कासापुरी शिवारात घडली.
पाथरी तालुक्यातील कासापुरी आणि पाथरगव्हाण केंद्रावर ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र आहे. या उपकेंद्रातून जवळा झुटा व नाथरा येथे ११ केव्ही वीज तार गेली आहे. जवळा झुटा शिवारात शेत गट नं. ७८ मध्ये तुषार संभाजी कोल्हे (८) हा मुलगा वासराला पाणी पाजण्यासाठी हौदावर गेला होता. याच हौदावरुन नाथरा गावाकडे जाणारी ११ केव्हीचा वीज तार गेली होती. नाथरा आणि जवळा झुटा या दोन गावच्या कट पॉर्इंटवर विजेची तार तुटून तुषार कोल्हे याच्या अंगावर पडली. यात तारेमध्ये वीज प्रवाह असताना त्याला जोराचा शॉक बसला. यात तो गंभीररित्या भाजला.
जखमी अवस्थेत सुरुवातीला पाथरगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर परभणीच्या शासकीय रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना १९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. (वार्ताहर)
जखमीला मिळणार नुकसान भरपाई
विजेचा शॉक लागून कासापुरी येथील तुषार कोल्हे हा जखमी झाला. याबाबत वीज वितरण कंपनीचे उपअभियंता कुरे यांच्याशी संपर्क साधला असताना जखमीला तातडीने वीज कंपनीकडून आर्थिक मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
अनेक गावांत वीजतारेची समस्या
ग्रामीण भागामध्ये ट्रान्सफार्मरला जोडणाऱ्या आणि ट्रान्सफार्मरवरुन गावात जाणारी व शेतातील वीज तारा अनेक ठिकाणी नादुरुस्त आहेत. यापूर्वीही वीज तारा तुटल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वीज कंपनीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.