मुलाची झाली मामाशी भेट
By Admin | Updated: December 1, 2014 01:26 IST2014-12-01T01:11:25+5:302014-12-01T01:26:13+5:30
औरंगाबाद : रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या सतर्कतेने आणि मोबाईल क्रमांक तोंडपाठ असल्यामुळे गाडी सुटल्यामुळे रविवारी रेल्वेस्थानकावर राहिलेल्या दहा वर्षीय मुलाची मामाशी भेट झाली.

मुलाची झाली मामाशी भेट
औरंगाबाद : रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या सतर्कतेने आणि मोबाईल क्रमांक तोंडपाठ असल्यामुळे गाडी सुटल्यामुळे रविवारी रेल्वेस्थानकावर राहिलेल्या दहा वर्षीय मुलाची मामाशी भेट झाली.
रोहित नारायण कच्छवे (रा. मुंबई) असे या मुलाचे नाव आहे. रोहित आपल्या मोठ्या भावाबरोबर तपोवन एक्स्प्रेसने रविवारी मानवतहून मुंबईला जात होता. औरंगाबाद रेल्वेस्थानक येण्याआधी रोहित स्वच्छतागृहात गेला होता. रोहित स्वच्छतागृहातून बाहेर आला त्यावेळी रेल्वे औरंगाबाद रेल्वेस्थानकावर आली होती. याचवेळी उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने रोहित बोगीबाहेर आला. गाडी रवाना होईपर्यंत प्रवाशांच्या गर्दीमुळे त्याला बोगीत चढता आले नाही. रेल्वे रवाना होईपर्यंत त्याची बोगीत चढण्याची धडपड सुरू होती; परंतु रेल्वे निघून गेल्याने त्याला काय करावे सुचेनासे झाले. त्यामुळे गोंधळून गेला. यावेळी रेल्वे सुरक्षाबलाचे कॉन्स्टेबल एस.एस. गायकवाड यांनी रोहितची स्थिती पाहून याबाबत सहायक उपनिरीक्षक किशोर मलकूनाईक यांना माहिती दिली. यावेळी रोहितशी त्यांनी संवाद साधत घरच्यांविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोहितने त्याच्या मामाचा मोबाईल क्रमांक सांगितला. त्यामुळे यावेळी या क्रमांवर संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती त्याच्या मामाला देण्यात आली. मामाने याबाबत औरंगाबादेतील रोहितच्या चुलत मामाला माहिती दिली. त्यानंतर रोहितचे चुलत मामा रेल्वे सुरक्षाबलाच्या ठाण्यात आले. यावेळी रोहितने आपल्या चुलत मामाला ओळखले. त्यानंतर त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
मोबाईल क्रमांक उपयोगी
लहान मुलांनी एखादा मोबाईल क्रमांक पाठ केल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. या घटनेतही हेच दिसून आले. त्यामुळे किमान प्रवासादरम्यान तरी लहान मुलांकडे एखादा मोबाईल क्रमांक राहील याची काळजी घेतली पाहिजे, असे सहायक उपनिरीक्षक किशोर मलकूनाईक म्हणाले.