गुप्तधनासाठी बालकाच्या नरबळीचा प्रयत्न?
By Admin | Updated: April 6, 2016 01:27 IST2016-04-06T00:46:20+5:302016-04-06T01:27:45+5:30
वाळूज महानगर : गुप्तधनाच्या लालसेपोटी संजय विनोद जाधव या नऊ वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना वाळूजमध्ये उघडकीस आली आहे.

गुप्तधनासाठी बालकाच्या नरबळीचा प्रयत्न?
वाळूज महानगर : गुप्तधनाच्या लालसेपोटी संजय विनोद जाधव या नऊ वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना वाळूजमध्ये उघडकीस आली आहे. गंभीर जखमी झालेल्या बालकावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरोपी गणेश बुट्टे हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विनोद जाधव (रा. समता कॉलनी, वाळूज) हे हरी पवार यांच्या घरात पत्नी नंदाबाई, मुलगी शीला व मुलगा संजय यांच्यासह वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी गणेश कारभारी गुट्टे याने रूम भाड्याने घेण्याच्या निमित्ताने विनोद जाधव यांच्याशी संपर्क वाढविला होता. जाधव राहत असलेल्या कॉलनीत त्याने काही दिवस चकराही मारल्या होत्या. ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गणेश गुट्टे हा जाधव यांच्या कॉलनीत आला. ऊस खाऊन येऊत, असे म्हणून त्याने जाधव यांचा मुलगा संजय यास दुचाकीवर बसवून तो रामराई शिवारात घेऊन गेला होता. सायंकाळी उशिरापर्यंत संजय घरी न परतल्यामुळे पालकांनी परिसरात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
रामराईपासून दोन कि.मी. अंतरावर संजय जाधव हा गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांना दिसून आला. दोघा दुचाकीस्वारांनी जखमी संजय याची विचारपूस करून त्यास पत्ता विचारला व त्याच्या घरी आणून सोडले. गंभीर जखमी अवस्थेतील संजयला त्यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर सोमवारी त्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
काकाने पळविले
‘मारुती मंदिर प्रांगणात खेळत असताना गणेश गुट्टे आपल्याजवळ आला. ऊस खाऊन येऊत, असे म्हणून त्याने गाडीवर बसविले. गुट्टे काका ओळखीचा असल्याने आपणही त्याच्यासोबत गेलो. त्याने दुचाकीवरून रामराई शिवारातील निर्जनस्थळी नेले.
मला मारहाण करून पूजेचे साहित्य असलेली पिशवी बाजूला ठेवली आणि गळा आवळला,’ असा घटनाक्रम संजय जाधवने कथन केला. बेशुद्ध झाल्यामुळे पुढील घटनाक्रम त्याला आठवला नाही.
दैव बलवत्तर म्हणून...
शुद्धीवर आल्यावर संजय यास आसपास कुणीही नसल्याचे तसेच तोंडावर गंभीर जखमा असल्याचे व रक्त येत असल्याचे दिसून आले. घाबरलेल्या संजयने त्या निर्जन स्थळावरून जवळपास एक कि.मी. पायी येत मुख्य रस्ता गाठला. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याची अवस्था बघून चौकशी केली तसेच दुचाकीवर बसवून त्याला घरी आणून सोडले.
नरबळीचा प्रयत्न : पालकांचा आरोप
गुप्तधनाच्या लालसेतून गणेश गुट्टे याने संजय जाधवचे अपहरण करून नरबळी देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विनोद जाधव यांनी केला. गुट्टेच्या मारहाणीत संजय जाधवचे तीन दात पडले. गळ्यावर तसेच कपाळावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आरोपी गणेश बुट्टेविरुद्ध मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीच्या अटकेनंतर घटनेची सत्यता कळेल.