देवगाव रंगारीत चिकुन गुन्या, डेंग्यूची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:04 IST2021-07-19T04:04:11+5:302021-07-19T04:04:11+5:30
देवगाव रंगारी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता देवगाव रंगारी परिसरात डेंग्यू व चिकुन गुन्याची साथ पसरली आहे. त्यामुळे येथील ...

देवगाव रंगारीत चिकुन गुन्या, डेंग्यूची साथ
देवगाव रंगारी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता देवगाव रंगारी परिसरात डेंग्यू व चिकुन गुन्याची साथ पसरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खासगी तसेच शासकीय रुग्णालयातील ओपीडीची संख्या वाढीस लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहा पोलिसांची डेंग्यू तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बहुतांश वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी जमा होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. ताप, खोकला, नाक गळणे आदी लक्षणे दिसून येत असल्याने कोरोना झाला की काय अशी भीती नागरिकांत निर्माण झाली. त्यातच देवगाव रंगारी परिसरात चिकुन गुन्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. चिकुन गुन्यामुळे ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायूवेदना व सूज आदी लक्षणे आहेत, तर डेंग्यूची तापेने येथील अनेक रुग्ण फणफणले असल्याचे समोर आले आहे. देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातील सहा कर्मचाऱ्यांना डेंग्यूची लागण झाली आहे.
-----
या उपाययोजना करा
देवगाव रंगारी ग्रामपंचायतीच्या वतीने धूरफवारणी करण्यात आली आहे. परंतु प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. चिकुन गुन्या व डेंग्यूची साथ रोखण्यासाठी भांडी आठवड्यातून एखादा कोरडी करून ठेवावी. पाणी शक्यतो साठवू नये, घराभोवतालचा परिसर स्वच्छ, कोरडा ठेवा. वापरात नसलेल्या वस्तूंची स्वच्छता करा, पूर्ण अंग झाकेल अशी कपडे परिधान करा.