वाढीव रुग्णालय जागेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे
By Admin | Updated: January 14, 2017 00:22 IST2017-01-14T00:20:00+5:302017-01-14T00:22:06+5:30
बीड : येथील जिल्हा रुग्णालयाच्या वाढीव २०० खाटांच्या जागेसंदर्भातील अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

वाढीव रुग्णालय जागेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे
बीड : येथील जिल्हा रुग्णालयाच्या वाढीव २०० खाटांच्या जागेसंदर्भातील अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. गृह विभागाच्या अखत्यारीत जिल्हा रुग्णालयालगतची जागा यासाठी निवडण्यात आली असून, या जागेची पाहणी पोलीस महासंचालक व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दोन दिवसांपूर्वी केली आहे.
येथील जिल्हा रुग्णालयात खास महिलांसाठी २०० खाटांची वाढीव मागणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. यासाठी गृह विभागाच्या अखत्यारीत असलेली जिल्हा रुग्णालयालागूनच मोकळी जागा आहे. ती जागा जिल्हा रुग्णालयाने मागितली आहे. यावरून पोलीस महासंचालक व्ही. लक्ष्मीनारायण यांनी प्रत्यक्ष येऊन जिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या वाढीव खाटांसाठीच्या जागेचीी पाहणी केली आहे. यासंदर्भातील अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे दाखल झाला असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सध्या बीड जिल्हा रुग्णालयात ३१० खाटांना मंजुरी आहे; मात्र ५०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. परिणामी उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याने दोन वर्षांपूर्वीच जिल्हा रुग्णालयामार्फत नवीन २०० खाटांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा बैठक घेऊन मंजुरी दिलेली आहे. आता केवळ गृह विभागाच्या जागा परवानगीवरच नवीन २०० खाटांचे भिजत घोंगडे अडले आहे. हा मार्गदेखील मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)