मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला केले नाराज
By Admin | Updated: July 13, 2016 00:38 IST2016-07-13T00:17:02+5:302016-07-13T00:38:24+5:30
औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याला नाराज केल्याचा आरोप मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला केले नाराज
औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याला नाराज केल्याचा आरोप मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख यांनी केला आहे.
अॅड.देशमुख यांनी मंत्रिमंडळ विस्ताराप्रकरणी मराठवाड्याला कसे डावलण्यात आले, याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. प्रसिद्धीपत्रकात ते म्हणतात, नागपुरी मुख्यमंत्र्यांना नागपूर कराराचा विसर पडला आहे. मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ९० लाखांच्या आसपास गेली आहे. विभागातील ४ लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात आहेत. याउलट विदर्भाची लोकसंख्या २ कोटी ३ लाख आहे. तेथील ८ लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर २० लाख लोकसंख्येमागे १ मंत्री असे प्रमाण येत आहे. विदर्भातील ३० लाख लोकसंख्येमागे १ मंत्री तर मराठवाड्यात ४५ लाख लोकसंख्येमागे १ मंत्री असे प्रमाण आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून आलेल्या काही संस्था विदर्भात पळविल्या आहेत. हे करीत असताना त्यांच्याकडून नागपूर कराराचा भंग झाला आहे. ही एक प्रकारची सापत्न वागणूक आहे. येथील लोकप्रतिनिधी याप्रकरणी बोलण्यास तयार नाहीत. मराठवाड्यातील ११ आमदारांमागे १ मंत्री असे प्रमाण आहे. तेच विदर्भात ७ आमदारांमागे १ मंत्री असे येते. मराठवाडा जनता विकास परिषद मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराज आहे. मराठवाड्याला जास्तीचा वाटा मिळणे, अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विभागातील लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी एकजूट करून आवाज उठविला पाहिजे. असे मत अॅड.देशमुख यांनी व्यक्त केले.