छत्रपतींचा पुतळा बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:52 IST2017-09-12T00:52:46+5:302017-09-12T00:52:46+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासंदर्भात प्राधिकरणांच्या निवडणुकीनंतर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

छत्रपतींचा पुतळा बसविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासंदर्भात प्राधिकरणांच्या निवडणुकीनंतर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा विद्यापीठात बसविण्याचा ठराव पारित झालेला असताना, काही संघटनांच्या दबावाला बळी पडून कुलगुरू पुतळा बसविण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
खा. चंद्रकांत खैरेंसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी सायंकाळी कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले. अर्थसंकल्पात ४० लाख रुपयांची तरतूद केलेली असताना छत्रपतींचा पुतळा का उभारण्यात आला नाही? असा सवाल कुलगुरूंना विचारण्यात आला. यावर कुलगुरू म्हणाले की, निवडणुका होत असल्याने सर्व प्राधिकरणे बरखास्त केलेली आहेत. त्यामुळे पुतळा उभारणीचे काम लांबणीवर पडलेले आहे.
जोपर्यंत कुलगुरू काही ठोस उत्तर देत नाहीत, तोपर्यंत दालनातून जाणार नाही. कुलगुरूंनी जो काही निर्णय आहे, तो आम्हाला सांगावा. त्यांना ठराव मंजूर नसेल तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. कुलगुरू उत्तर देणार नसतील तर त्यांची राज्यपालांकडे तक्रार करावी, अशी भूमिका सेना पदाधिकाºयांनी बोलून दाखविली.
सेनेच्या शिष्टमंडळात आ. विनोद घोसाळकर, अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले, विनायक पांडे, नरेंद्र त्रिवेदी, अरुण शेळके, राजू वैद्य, पूनम सलामपुरे, सुरेश पवार, अंकुश रंदे, विजू वाघमारे, हिरा सलामपुरे, तुकाराम सराफ आदींचा समावेश होता. दालनात सहायक पोलीस उपायुक्त ज्ञानोबा मुंडे, पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे आणि वसीम हाश्मी उपस्थित होते.