छत्रपती संभाजीनगर : इंडिगोने तीन महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये शहरातून अहमदाबाद विमानसेवा बंद केली. त्यानंतर आता इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-नागपूर ही विमानसेवा एप्रिलपासून बंद होणार आहे. ही विमानसेवा बंद होणार असल्याने आता नागपूरला जाण्यासाठी केवळ रस्ते मार्गाचाच पर्याय उरणार आहे.
इंडिगोने छत्रपती संभाजीनगरचे ३० मार्च ते २५ ऑक्टोबर या कालावधीतील वेळापत्रक जाहीर केले असून, यात नागपूर विमानसेवा वगळली आहे. छत्रपती संभाजीनगरातील हवाई क्षेत्रासाठी आणि विमान प्रवाशांसाठी ही चिंतेची बाब आहे. इंडिगोने २ जुलै २०२४ पासून नागपूर- छत्रपती संभाजीनगर-गोवा आणि गोवा-छत्रपती संभाजीनगर-नागपूर विमानसेवा सुरू केली होती. या विमानसेवेमुळे प्रवाशांना अवघ्या सव्वा तासात नागपूरला जाणे शक्य झाले होते. परंतु आता एप्रिलपासून नागपूरची विमानसेवा बंद होणार आहे. यासंदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
२९ मार्च रोजी शेवटचे उड्डाणनागपूरसाठी आजघडीला आठवड्यातून ३ दिवसांसाठी विमान उड्डाण घेते. आता २९ मार्च रोजी नागपूरसाठी शहरातील शेवटचे उड्डाण ठरणार आहे. पुन्हा ही विमानसेवा कधी सुरू होते, याकडे लक्ष लागले आहे.
गाेव्याला विमानाने जाण्यास पसंतीगोव्याला विमानाने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. आता एप्रिलपासून गोवा-छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर-गोवा विमानसेवा राहणार आहे. शहरातून गोव्याला जाणाऱ्यांसाठी आणखी जागा वाढतील.
रेल्वे कनेक्टिव्हिटीचा अभावनागपूरसाठी आजघडीला रेल्वेचीही कनेक्टिव्हिटी नाही. एसटी, खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी वाहनांचाच पर्याय प्रवाशांना उरला आहे.
विमानसेवा वाढीसाठी पाठपुरावाइंडिगोचे नवे वेळापत्रक सोमवारी समोर आले. बरीच सेवा रद्द होण्याची चर्चा होती. मात्र, सुदैवाने नागपूर वगळता इतर कोणत्याही सेवांवर परिणाम झाला नाही. यापूर्वी डिसेंबरमध्ये अहमदाबाद विमानसेवा बंद झाली. शहरातून विमानसेवा वाढीसाठी पाठपुरावा केला जात आहे.-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी (एटीडीएफ)