छत्रपती संभाजीनगर: दिवसभर चाललेल्या प्रचंड राजकीय ड्रामानंतर छत्रपती संभाजीनगरपंचायत समितीवर अखेर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. भाजपचे कल्याण गायकवाड ९ विरुद्ध ८ मतांनी सभापती पदी निवडून आले आहेत, तर उपसभापती पदी शिंदेसेनेचे बाळासाहेब गाढे यांचा विजय झाला आहे. ठाकरेसेनेचे (उबाठा) तीन सदस्य मतदानाला गैरहजर राहिल्याने आणि शिंदेसेनेत पडलेल्या फुटीमुळे या निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला.
दानवेंचा रुद्रावतार आणि कॉलर पकडण्याचे सत्रनिवडणूक सुरू होण्यापूर्वी ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप सदस्य कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडल्याने एकच खळबळ उडाली होती. "आमचे तीन सदस्य कुठे आहेत? त्यांना भाजपने पळवले आहे," असा आरोप करत दानवे यांनी पंचायत समितीबाहेर कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला होता. मात्र, या विरोधानंतरही हे तीन सदस्य मतदानासाठी आलेच नाहीत, ज्याचा थेट फायदा भाजपला झाला.
शिंदेसेनेत दोन गट आणि मविआचा प्रयोग फसला या निवडणुकीत शिंदेसेनेतही स्पष्ट दोन गट पाहायला मिळाले. ३ सदस्य पालकमंत्री संजय शिरसाट यांचे तर ३ सदस्य संदीपान भुमरे यांच्या गटाचे होते. भुमरे गट भाजपच्या विरोधात जाऊ शकतो, अशी कुजबूज असतानाच भाजपच्या रणनीतीमुळे ठाकरे गटाचे ३ सदस्य अनुपस्थित राहिले. महाविकास आघाडीने राष्ट्रवादीच्या ( अजित पवार ) अनुराग शिंदे यांना पाठिंबा दिला होता, मात्र बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नाही.
अंतिम निकाल:
सभापती पद: कल्याण गायकवाड (भाजप) - ९ मते (विजयी) विरुद्ध अनुराग शिंदे (अजित पवार गट) - ८ मते.
उपसभापती पद: बाळासाहेब गाढे (शिंदेसेना) - १० मते (विजयी) विरुद्ध ८ मते.
Web Summary : BJP triumphed in Chhatrapati Sambhajinagar Panchayat Samiti elections. Kalyan Gaikwad became Chairman. Political drama unfolded with Sena factions and MVA's strategy failing due to absent members.
Web Summary : भाजपा ने छत्रपति संभाजीनगर पंचायत समिति चुनाव जीता। कल्याण गायकवाड़ अध्यक्ष बने। शिवसेना गुटों और एमवीए की रणनीति सदस्यों के अनुपस्थित रहने के कारण विफल रही।