छत्रपती संभाजीनगर: शहरातील आकर्षणाचे केंद्र, भाविकांचे श्रद्धास्थान आणि 'ऑक्सिजन हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान टेकडीला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. वाळलेले गवत आणि सोसाट्याचा वारा यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण करत संपूर्ण टेकडीला आपल्या विळख्यात घेतले होते. मात्र, मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक आणि माजी लोकप्रतिनिधींच्या सतर्कतेमुळे वेळेत आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
पहाटेच्या अंधारात आगीचा थरारनेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास नागरिक टेकडीवर फिरण्यासाठी आले असताना त्यांना चोहोबाजूंनी आगीच्या ज्वाला दिसल्या. वाळलेल्या गवतामुळे आग वेगाने पसरत होती. आगीचे गांभीर्य ओळखून उपस्थित नागरिकांनी आणि काही माजी लोकप्रतिनिधींनी तातडीने झाडांच्या फांद्या आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझवण्यास सुरुवात केली.
मोठी वृक्षहानी टळलीहनुमान टेकडीवर हजारो वृक्ष लावण्यात आले आहेत. जर ही आग वेळेत विझवली गेली नसती, तर या संपूर्ण वृक्षसंपदेचे नुकसान झाले असते. नागरिकांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे शहरातून कौतुक होत आहे. मात्र, ही आग नेमकी कशी लागली? की कुणी मुद्दाम लावली? याबाबत आता शंका व्यक्त केली जात असून, प्रशासनाने याची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.