Samruddhi Mahamarg Crime News: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर असलेल्या एका टोल नाक्यावर एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. यात पोटात गोळी लागून कर्मचारी जखमी झाला आहे. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या सावंगी येथे ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
छत्रपती संभाजीनगरपासून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सावंगी येथे टोल नाका आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
रात्री टोल नाक्यावर दोन कर्मचाऱ्याचा वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेला. त्यानंतर एका कर्मचाऱ्याने थेट पिस्तुलच काढले आणि दुसऱ्या कर्मचाऱ्यावर गोळीबार केला.
गोळीबारात दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या पोटात गोळी घुसली. तो रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने छत्रपती सभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव भारत घाटगे असे आहे.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. गोळीबार करणारा व्यक्ती फरार असून, त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्याकडे पिस्तुल आले कोठून?
टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडे कंपनीकडून पिस्तुल दिले जात नाही. मग या कर्मचाऱ्याकडे पिस्तुल आले कोठून आणि कोणत्या उद्देशाने तो पिस्तुल जवळ बाळगत होता. यापूर्वी त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून काही गुन्हे केले आहेत का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.