अपंगांना वाटलेल्या गिरण्यांची तपासणी !

By Admin | Updated: February 4, 2015 00:41 IST2015-02-04T00:34:32+5:302015-02-04T00:41:39+5:30

हणमंत गायकवाड , लातूर अपंग अपंग पुनर्वसन योजनेतून वाटप करण्यात आलेल्या मिनी पिठाच्या गिरण्यांची तपासणी करण्यात येणार असून, समाजकल्याण अधिकाऱ्यांना तसे

Checking the mills distributed to the disabled! | अपंगांना वाटलेल्या गिरण्यांची तपासणी !

अपंगांना वाटलेल्या गिरण्यांची तपासणी !


हणमंत गायकवाड , लातूर
अपंग अपंग पुनर्वसन योजनेतून वाटप करण्यात आलेल्या मिनी पिठाच्या गिरण्यांची तपासणी करण्यात येणार असून, समाजकल्याण अधिकाऱ्यांना तसे निर्देश अतिरिक्त सीईओंनी दिले आहेत़ दरम्यान, ज्या कंपनीकडून या गिरण्या खरेदी केल्या आहेत, त्या कंपनीलाही ‘समाजकल्याण’ने पत्र पाठविले असून, बनावट गिरणी बदलून द्यावी अथवा सदोष करुन द्यावी, असे या पत्रात म्हटले आहे़
‘समाजकल्याण’ने दिलेली गिरणीच अपंग या मतळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून, वाटप करण्यात आलेल्या सर्वच पिठाच्या गिरण्यांची तपासणी करण्याचा निर्णय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे यांनी घेतला आहे़ समाजकल्याण अधिकाऱ्यांना तसे लेखी निर्देशही त्यांनी दिले आहेत़ लातूर जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये समाजकल्याण विभागाने १३३ मिनी पिठाच्या गिरण्यांचे वाटप केले आहे़ औसा तालुक्यातील नागरसोगा येथील अनिता नारायण माळी या अपंग महिलेला वाटप करण्यात आलेली पिठाची गिरणी चालत नाही़ पंधरा मिनिटातच ती बंद पडते़ शिवाय, दळणही दळले जात नाही़ त्यामुळे या महिलेने मशिन बदलून मिळावी म्हणून समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची दारे ठोठावली होती़ मात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या महिलेला दाद दिली नाही़ त्यामुळे तिने लोकशाही दिनात तक्रार दिली़ या तक्रारीमुळे ‘समाजकल्याण’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गिरणीची तपासणी केली़ परंतु गिरणी बदलून मिळाली नाही़ ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर घेताच प्रशासन खडबडून जागे झाले असून, वाटप करण्यात आलेल्या सर्व गिरण्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्याअनुषंगाने समाजकल्याण अधिकारी श्रीमती एस़एनग़ाडेकर यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तपासणीचे निर्देशही दिले आहेत़
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने अपंगांना पिठाची गिरण्या वाटप केल्या आहेत़ त्या मध्ये लातूर तालुक्यातील २०, औसा तालुक्यात २०, निलंगा तालुक्यात २०, देवणी तालुक्यात ८, शिरुर अनंतपाळ तालुक्यात ८, उदगीर तालुक्यात १३, जळकोट तालुक्यात ८, अहमदपूर तालुक्यात १३, चाकूर तालुक्यात १३, रेणापूर तालुक्यात १० अशा एकूण १३३ अपंगांचा समावेश आहे़ वाटप झालेल्या गिरण्या चालू आहेत की, बंद पडल्या आहेत, याची तपासणी जिल्हा परिषदेच्या मार्फत आता होणार आहे़

Web Title: Checking the mills distributed to the disabled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.