तब्बल २० तास चालली उत्तरपत्रिकांची तपासणी
By Admin | Updated: November 24, 2014 00:34 IST2014-11-24T00:18:01+5:302014-11-24T00:34:51+5:30
जालना : जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हा परिषदेसाठी शिपाई पदाच्या परीक्षा पेपर तपासणीची प्रक्रिया तब्बल २० तास चालली. त्यानंतर निकालाची यादी फलकावर झळकविण्यात आली.

तब्बल २० तास चालली उत्तरपत्रिकांची तपासणी
५१ पदांसाठी शनिवारी शिपाई पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. १८ हजार ८८९ उमेदवारी या पदासाठी अर्ज केला होता. त्यापैकी प्रत्यक्षात १४ हजार ७०७ उमेदवारांनी परीक्षा दिली. शहरातील ४२ केंद्रांवर ही परीक्षा शनिवारी पार पडली. त्यानंतर सायंकाळपर्यंत उत्तरपत्रिका जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात आणण्यात आल्या.
ओएमआर पद्धतीने परीक्षा तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती. सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांद्वारे पेपर तपासणीचा प्रत्येक क्षण टिपला जात होता. शनिवारी सायंकाळी सुरूवातीला उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले. मात्र ही प्रक्रिया रविवारच्या पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती. तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सभागृहातच मुक्काम ठोकला.
त्यानंतर रविवारी सकाळी ९ वाजेपासून पुन्हा तपासणीचे काम सुरू झाले. ही प्रक्रिया रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. या प्रक्रियेमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख व पी.टी. केंद्रे हे सभागृहातच तळ ठोकून होते. (प्रतिनिधी)४
जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात शिपाई पदासाठी झालेल्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू होती. त्यासाठी कार्यालयातील काही मोजके कर्मचारी वगळता अन्य कर्मचारी तसेच इतरत्र व्यक्तींना सभागृहात प्रवेश बंद करण्यात आला होता. प्रवेशद्वारासमोरच शनिवारी सायंकाळपासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
४परीक्षा तपासणी लवकर होऊन निकालाची यादी फलकावर झळकेल, या आशेने काही परीक्षार्थींनी रविवारी सकाळपासून कार्यालयासमोर गर्दी केली होती. परंतु यादी सायंकाळनंतर लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आल्यानंतर ही गर्दी ओसरली. या गर्दीत काही बाहेरगावचेही होते.