खाजगी सावकारांचा सामान्यांना जाच

By Admin | Updated: June 16, 2014 01:13 IST2014-06-16T00:03:43+5:302014-06-16T01:13:29+5:30

सखाराम शिंदे , गेवराई गेवराई शहरासह तालुक्यात सध्या फायनान्सच्या नावाखाली खाजगी सावकारी बेलगाम सुरू आहे.

Check the public lenders to the common man | खाजगी सावकारांचा सामान्यांना जाच

खाजगी सावकारांचा सामान्यांना जाच

सखाराम शिंदे , गेवराई
गेवराई शहरासह तालुक्यात सध्या फायनान्सच्या नावाखाली खाजगी सावकारी बेलगाम सुरू आहे. याकडे संबंधित विभाग, पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने अशा सावकारांचा जाच वाढल्याचे दिसून येत आहे.
दोन वर्षांपासून गेवराई तालुक्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. शेतीमध्ये वारेमाप खर्च करुनही पावसासह इतर कारणाने अपेक्षित उत्पादन निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पुरेसे उत्पादन न झाल्यावर शेतकऱ्यांना बँकेचे घेतलेले पीक कर्ज वेळेवर फेडता येत नाही. यामुळे पुन्हा पेरणीसाठी बँक कर्ज देत नाही. अशा परिस्थितीत पेरणीसह शेती खर्चासाठी शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो.
अनेकदा मुलीचे लग्न, विहीर खोदणे, पाईप लाईन किंवा आजारपण अशावेळी शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. खाजगी सावकार शेकडा ५ ते १० टक्के व्याज दरमहिन्यात आकारतात. यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा आकडा वाढतच जातो. अनेकदा खाजगी सावकार शेतकऱ्यांची जमीन रजिस्ट्री करुन घेतात. शेतकऱ्यांनी वेळेवर परतफेड न केल्यास रजिस्ट्री करुन घेतलेल्या जमिनीची सावकार परस्पर विक्री करतात तर कधी-कधी जमिनीवर ताबाही आणतात. घेतलेले कर्ज वेळेवर न फेडल्यामुळे अनेकदा सावकार पैशासाठी शेतकऱ्यांचा छळ करीत असल्याने शेतकऱ्यांना जमीन विकण्याशिवाय पर्याय नसतो.
शेतकऱ्यांसह गेवराई येथील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना येथील खाजगी सावकार कर्जही देतात. येथील आठवडी बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना येथील ठराविक सावकार हातावर व्याजाने पैसे देत असल्याने व्यापारी ते पैसे घेतात. हे सावकार व्यापाऱ्यांकडून प्रत्येक बुधवारी ठराविक रक्कम आकारतात. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असले तरी व्यापाऱ्यांना कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो.
तालुक्यातील काही नोकरदारही खाजगी सावकाराच्या सापळ्यात अडकलेले आहेत. अनेकदा खाजगी सावकार घर बांधणे, चारचाकी वाहन घेणे यांनाही कर्ज देतात. नोकरदारांनी या कारणांसाठी कर्ज घेतल्यानंतर वारंवार खाजगी सावकाराकडून त्यांचा अपमानही केला जातो. काही सावकार तर कर्ज घेणारांकडून पैसे घेताना व देताना दोन्ही वेळेस मोठमोठ्या रकमेच्या पार्ट्याही झोडतात. अशा खाजगी सावकारकीचा विळखा तालुक्याला पडला असून, याचा बंदोबस्त करण्याची मागणी राजेंद्र मोटे, अक्षय पवार आदींनी केली आहे. या संदर्भात पोनि सुरेंद्र गंधम म्हणाले, खाजगी सावकारकी संदर्भात तक्रार आल्यास कारवाई करू.
महिन्याकाठी होतेय लाखोंची उलाढाल
गेवराई तालुक्याला दोन वर्षांपासून दुष्काळाची झळ बसत असल्याने खाजगी सावकारांचा धंदा आला तेजीत
येथे अनेक खाजगी सावकार विना परवाना सावकारकी करीत असून, ते ५ ते १० टक्के दराने सामान्यांना पैसे
काही सावकार आठवड्याला तर काही सावकार महिन्याला करतात व्याजाची वसुली
गेवराई येथील आठवडी बाजारात येणारे अनेक छोटे-मोठे व्यावसायिकही घेतात खाजगी सावकाराकडून पैसे
बाजारात फिरू लागले खाजगी सावकार
येथील बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून खाजगी सावकार विना परवाना सावकारकी करीत आहेत. आता बी-बियाणे खरेदीचे दिवस असल्याने ते नडलेल्या शेतकऱ्यांना हेरतात व महागड्या दराने व्याजाने पैसे देतात. शेत मशागत, पेरणी असे खर्च शेतकऱ्यांना करावे लागत असल्याने शेतकरीही सावकाराच्या अटींना बळी पडताना दिसून येत आहेत.

Web Title: Check the public lenders to the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.