अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी
By Admin | Updated: February 6, 2015 00:57 IST2015-02-06T00:39:02+5:302015-02-06T00:57:09+5:30
बीड : जिल्हा परिषदेत गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समिती बैठकीत अपंग कर्मचारी प्रमाणपत्रांच्या तपासणीचा ठराव संमत करण्यात आला.

अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी
बीड : जिल्हा परिषदेत गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समिती बैठकीत अपंग कर्मचारी प्रमाणपत्रांच्या तपासणीचा ठराव संमत करण्यात आला. दलित वस्ती विकास योजनेच्या निधीवाटपासह दुष्काळी उपायांच्या अनुषंगाने चर्चा झाली.
अध्यक्ष विजयसिंह पंडित, उपाध्यक्षा आशा दौंड, सभापती संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, कमल मुंडे, महेेंद्र गर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती. सीईओ नामदेव ननावरे, प्रभारी अतिरिक्त सीईओ नईमोद्दीन कुरेशी, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती यांची उपस्थिती होती. बैठकीत शिक्षण, समाजकल्याण, पाणीपुरवठा, आरोग्य या विभागांच्या अनुषंगाने चर्चा झाली.
सदस्या काशीबाई गवते यांनी अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे ग्रामसेवक, शिक्षकपदी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा छडा लावण्याची मागणी केली. त्यानुसार अध्यक्ष पंडित यांनी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. सभापती महेंद्र गर्जे, बजरंग सोनवणे यांची समिती प्रमाणपत्रांची तपासणी करणार आहे. सन २००० पासूनच्या अपंग कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे तपासली जाणार आहेत. अपंग कोट्यातून नोकरी मिळविणाऱ्यांना व बदली होऊन आलेल्यांना त्यामुळे दणका बसणार आहे. तपासणी अहवाल पुढील बैठकीसमोर ठेवण्यात येणार आहे.
यावेळी समाजकल्याणच्या दलित वस्ती विकास योजनेच्या रखडलेल्या निधीवरही चर्चा झाली. दोन टप्प्यांत मिळून अडीच कोटी रुपये उपलब्ध करण्याचा निर्णय झाला. गटनेते मदनराव चव्हाण, दशरथ वनवे यांनी दुष्काळाचे मुद्दे मांडले. उपाययोजना सुरु असल्याचे अध्यक्ष पंडित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गवते यांनीच विस्तार अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या बदल्या करताना आयुक्तांची परवानगी घेणे अपेक्षित होते;परंतु तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांच्या आदेशानेच बदल्या झाल्या होत्या. सभापती बजरंग सोनवणे यांनी पाच विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्दचा निर्णय घेतला. भीमराव नांदूरकर, जी.एन. चोपडे, मधूकर तोडकर, ऋषीकेश शेळके, तुकाराम जाधव यांचा समावेश आहे. नियमबाह्य बदल्या कोणी केल्या? याची चौकशी करुन त्या स्वीकारणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सोनवणे म्हणाले.