सराफा व्यापाऱ्याला भामट्यांनी सव्वापाच लाखांना फसविले
By Admin | Updated: July 2, 2014 01:03 IST2014-07-02T00:58:02+5:302014-07-02T01:03:36+5:30
लासूर स्टेशन : येथील एका सराफा व्यापाऱ्याला दोन भामट्यांनी सुमारे सव्वापाच लाख रुपयांना फसविले असून, संबंधित व्यापाऱ्याने तब्बल ११ दिवसांनंतर पोलिसांत फिर्याद नोंदविली.

सराफा व्यापाऱ्याला भामट्यांनी सव्वापाच लाखांना फसविले
लासूर स्टेशन : येथील एका सराफा व्यापाऱ्याला दोन भामट्यांनी सुमारे सव्वापाच लाख रुपयांना फसविले असून, संबंधित व्यापाऱ्याने तब्बल ११ दिवसांनंतर पोलिसांत फिर्याद नोंदविली.
येथील सराफा गल्लीतील रमेश ज्वेलर्स या दुकानात २० जून रोजी दोन इसम आले. त्यांनी रमेश वर्मा यांच्याकडून अर्धा ग्रॅम सोन्याची अंगठी खरेदी केली. त्यानंतर त्यांनी कानातले दाखविण्यास सांगून त्यातील काही वस्तू बाजूला काढून ठेवण्यास सांगितले. १ हजार रुपये अॅडव्हान्स देऊन नंतर येतो म्हणून दोघे निघून गेले. ते गेल्यानंतर वर्मा यांना ५ लाख ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेला डबा गायब झाल्याचे लक्षात आले. गेलेल्या ग्राहकाने बिलावर नमूद केलेल्या गावी म्हणजे वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथील संतोष बनसोडे नामक व्यक्तीचा शोध घेतला असता अशी कोणतीही व्यक्ती या गावात राहत नसल्याचे वर्मा यांना आढळले. त्यानंतर आपण फसले गेल्याची वर्मा यांना जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. वर्मा यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.