सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक
By Admin | Updated: December 9, 2015 23:51 IST2015-12-09T23:38:58+5:302015-12-09T23:51:00+5:30
कळंब : ‘घरी बसून महिन्याला दहा ते बारा हजार रुपये कमवा’ अशी जाहिरात करुन सुशिक्षित बेरोजगांराची फसवणूक केल्याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात दोघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक
कळंब : ‘घरी बसून महिन्याला दहा ते बारा हजार रुपये कमवा’ अशी जाहिरात करुन सुशिक्षित बेरोजगांराची फसवणूक केल्याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात दोघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कळंब येथील साठ ते सत्तर लोकांची अंदाजे दिड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
कळंब येथे काही लोकांनी 'आठवी ते पीएचडीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी' अशी जाहिरातबाजी केली होती. ‘घरी बसून लिखाण करा व दिवसाला तीनशे ते चारशे किंवा महिन्याला दहा ते बारा हजार रुपये कमवा’ असे या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले होते. यावर संपर्क क्रमांक देऊन तांदूळवाडी रोडवर कार्यालय असल्याचेही उल्लेखित करण्यात आले होते.
ही जाहिरात वाचून कळंब येथील दत्त नगर भागातील रहिवाशी अनिल गंगाधर शिंदे या सुशिक्षित बेरोजगार युवकाने संबंधितांशी संपर्क साधला. यावर त्यांना कार्यालयात येण्यास सांगण्यात आले. ते कार्यालयात गेल्यानंतर तेथे त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी कार्यालयातील व्यक्तिनी त्यांच्याकडून २५० रुपये प्रवेश फीही भरून घेतली. त्यानंतर दोन चार दिवसांनी करार फी म्हणून १२५० रुपये भरून घेतले. सहा ते आठ दिवस गेल्यानंतर शिंदे हे तांदूळवाडी रोड स्थित कार्यालयात भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना कार्यालय कुलूपबंद असल्याचे दिसून आले.
यावेळी त्यांना याठिकाणी आलेल्या इतर साठ ते सत्तर व्यक्तिंचीही अशाच प्रकारची फसवणूक झाल्याचे जाणवले. त्यामुळे अनिल गंगाधर शिंदे यांनी उपरोक्त आशयाची फिर्याद कळंब पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरुन बुधवारी विक्रांत बाबासाहेब शिंदे (रा.चोराखळी, हल्ली मुक्काम सोलापूर) आणि प्रशांत शिवराम बोराडे (सावरगाव, ता.भूम) या दोघांविरूध्द भादंवि कलम ४२०, ४६५, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)