जागा बळकावण्यासाठी चौक नामकरणाचा फंडा
By Admin | Updated: June 17, 2014 01:10 IST2014-06-17T00:55:39+5:302014-06-17T01:10:22+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगरमध्ये कोणाचीही परवानगी न घेता चौकाचे नामकरण करण्याचे प्रमाण वाढले

जागा बळकावण्यासाठी चौक नामकरणाचा फंडा
वाळूज महानगर : वाळूज महानगरमध्ये कोणाचीही परवानगी न घेता चौकाचे नामकरण करण्याचे प्रमाण वाढले असून, या गंभीर अतिक्रमणांकडे स्थानिक ग्रामपंचायत, एमआयडीसी, सिडको व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. जागा बळकावण्यासाठी व अतिक्रमण करण्यासाठी रात्रीतून नवनवीन चौकांची भर पडत आहे.
वाळूज महानगरातील बजाजनगर, सिडको, साऊथ सिटी परिसर, पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव शेणपुंजी, जोगेश्वरी, कमळापूर, वाळूज, बकवालनगर आदी परिसरात मोक्याच्या भूखंडांवर तसेच रहदारीच्या ठिकाणी फलक लावून चौकाचे नामकरण होत आहे. कारवाई टाळण्यासाठी या चौकांना महापुरुषांचे, राजकीय पक्षाच्या नेत्याचे नाव दिले जात आहे.
वास्तविक चौकाचे नामकरण करण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव संमत करावा लागतो. नंतर एमआयडीसी, सिडको व पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या परिसरातील मुख्य बाजारपेठ, रस्ते व चौकांत असे अनधिकृतपणे नामकरणाचे फलक लावले जात आहेत. या प्रकरणी कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमणधारकांचे फावत आहे. याविषयी सरपंच छाया कारले, कांताबाई जाधव, योगेश दळवी, रंजना भोंड, लक्ष्मीबाई कोरडकर आदींशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये चौकाचे नामकरण विनापरवाना होत असल्याचे मान्य केले.
हा परिसर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रात्रीतून चौकाचे नामकरण होते व चौकाची मोडतोड झाल्यास जातीय तेढ निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता असते. ग्रामपंचायतीकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे विनापरवाना चौकाचे नामकरण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे शक्य होत नसल्याची हतबलता परिसरातील सरपंच मंडळींनी व्यक्त केली.
कारवाई करण्यास टाळाटाळ
विनापरवाना व नियमबाह्यपणे होत असलेल्या चौकांच्या नामकरणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एमआयडीसी, ग्रामपंचायती, सिडको व पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे चौकांचे नियमबाह्य व विनापरवाना नामकरण वाढले आहे.
४याविषयी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे व वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चौकाचे विनापरवाना नामकरण करून झालेले अतिक्रमण स्थानिक ग्रामपंचायत, सिडको व एमआयडीसी प्रशासन हटविण्याची गरज आहे. विनापरवाना चौकाचे नामकरण होत असल्याची तक्रार आल्यास आम्ही पोलीस बंदोबस्त देऊन स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण हटवू शकतो. परंतु तक्रारच येत नसल्यामुळे आम्ही कोणावर कारवाई करावी, असा प्रश्नही त्यांनी विचारला.