चव्हाण दाम्पत्यास पोलिसांचा ‘पाहुणचार....!’
By Admin | Updated: August 1, 2016 00:07 IST2016-07-31T23:53:25+5:302016-08-01T00:07:09+5:30
औरंगाबाद : केबीसी घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार तथा कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण यांना जवाहरनगर पोलिसांनी नाशिक कारागृहातून अटक करून आणले

चव्हाण दाम्पत्यास पोलिसांचा ‘पाहुणचार....!’
औरंगाबाद : केबीसी घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार तथा कंपनीचा संचालक भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण यांना जवाहरनगर पोलिसांनी नाशिक कारागृहातून अटक करून आणले आहे. चव्हाण दाम्पत्याने औरंगाबादसह राज्यभरातील लाखो गुंतवणूकदारांकडून अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घातला होता. याप्रकरणी त्यांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी २०१४ मध्ये गुन्हे दाखल झाले होते. जवाहरनगर पोलीस ठाण्यात भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण, दादासाहेब चव्हाण, किशोर जोशी, संदीप जगदाळे हे आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले होते.
केबीसी कंपनीने एप्रिल २०११ मध्ये जालना रोडवरील अतिथी हॉल येथे एका मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी केबीसीचा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण, मराठवाडा व्यवस्थापक दादासाहेब पोटे यांनी १७ हजार २०० रुपये गुंतवणूक केल्यास तीन वर्षांनंतर १ लाख ३ हजार ५०० रुपये मिळतील, असे आमिष दाखविले होते. या मेळाव्यास शिवाजीनगर येथील रहिवासी सुभाष पाडळे, बाबासाहेब कंधारकर (रा.कुंभेफळ) यांच्यासह शेकडो गुंतवणूकदार उपस्थित होते. कंपनीचे मराठवाडा कार्यालय शिवाजीनगर येथे होते. तेथे पोटे यांच्याकडे गुंतवणूकदारांनी मोठ्या रकमा जमा केल्या होत्या. कंधारकर यांनी एकूण २ लाख ३३ हजार ४०० रुपये गुंतवणूक केली होती. त्यानुसार कंपनीकडून ११ आॅगस्ट २०१४ रोजी परतावा मिळणार होता. मात्र, त्यांना ही रक्कम न मिळाल्याने त्यांनी पोटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपीचा फोन बंद होता. त्यामुळे ते नाशिक येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयात गेले तेव्हा त्यांच्यासारख्या अनेकांकडून केबीसीने कोट्यवधी रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समजले.