आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या फौजदाराला धक्काबुक्की
By Admin | Updated: June 8, 2017 00:33 IST2017-06-08T00:32:07+5:302017-06-08T00:33:20+5:30
बीड : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यासाठी गेलेल्या शिवाजीनगरच्या फौजदाराला (पीएसआय) आरोपीचा नातेवाईक असलेल्या हवालदाराने धक्काबुक्की केली

आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या फौजदाराला धक्काबुक्की
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यासाठी गेलेल्या शिवाजीनगरच्या फौजदाराला (पीएसआय) आरोपीचा नातेवाईक असलेल्या हवालदाराने धक्काबुक्की केली. ही घटना बीड शहरातील बार्शी रोडवर मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी हवालदारासह १२ जणांविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबादास औसरमल असे त्या हवालदाराचे नाव आहे. औसरमल हे शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत आहेत. अंबादास औसरमल यांचा भाऊ जालिंदर औसरमल व पुतण्या योगेश औसरमल हे दोघे बाप-लेक बलात्कार प्रकरणातील आरोपी आहेत. हे दोघे सध्या पुणे येथे वास्तव्यास असून बीड येथील एका लग्नासाठी शहरातील एका मंगल कार्यालयात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बीड शहर ठाण्याचे फौजदार कैलास बेले हे मंगळवारी सायंकाळी मंगल कार्यालयात आरोपींना अटक करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना अंबादास औसरमल यांनी बेले यांना प्रतिबंध केला. तसेच त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचे बेले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी बेले यांना संबंधित हवालदाराविरूद्ध तक्रार देण्याचे आदेशित केले. त्यानुसार बेले यांनी शिवाजीनगर ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा तक्रार दिली. त्यावरून हवालदार अंबादास औसरमल, जालिंदर औसरमल यांच्यासह १२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास सपोनि भूषण सोनार करीत आहेत.