पाठलाग करून आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या
By Admin | Updated: December 1, 2014 01:26 IST2014-12-01T01:14:44+5:302014-12-01T01:26:56+5:30
पैठण : पैठण-पाचोड रोडवर घातक शस्त्रांसह पाच दरोडेखोर पैठणकडे आगेकूच करीत होते. रात्रीचे बारा वाजून गेलेले... सर्व रस्ता सामसूम झालेला... एव्हाना दरोडेखोरांनी रहाटगाव मागे टाकले.

पाठलाग करून आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या
पैठण : पैठण-पाचोड रोडवर घातक शस्त्रांसह पाच दरोडेखोर पैठणकडे आगेकूच करीत होते. रात्रीचे बारा वाजून गेलेले... सर्व रस्ता सामसूम झालेला... एव्हाना दरोडेखोरांनी रहाटगाव मागे टाकले. अंदाज घेत कधी शेतात लपत, कधी रोडवर येत दरोडेखोर आंतर कापत होते. तेवढ्यात परीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना या दरोडेखोरांबाबत पोलीस नेटवर्कद्वारे खबर मिळाली अन् त्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन शिताफीने दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
जाधव यांनी पैठण परिसरात पेट्रोलिंगवर असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भारती यांना कल्पना दिली, शिवाय एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गिरी यांना तयारीनिशी निघण्याच्या सूचना दिल्या. स्वत:बरोबरच पोलीस उपनिरीक्षक रसूल तांबोळी, जमादार विजय बाम्हंदे, विष्णू पवार, गायकवाड, शिंदे यांच्यासह दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी निघाले. कुणी कोठून, कसे यायचे व प्रसंगी काय करायचे या सूचना जाधव मोबाईलद्वारे सर्व सहकाऱ्यांना देत होते. दरोडेखोरांकडे घातक शस्त्र असल्याने मोहिमेवरील पोलिसांनीही आपले शस्त्र सज्ज ठेवले होते.
पाचोड रोडवर ठरल्याप्रमाणे आपापली जबाबदारी पार पाडत पोलिसांनी पाचोड रोड व त्याच्या चारही बाजूं वेढल्याचे तसेच पोलिसांचे वाहन समोरून येत असल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात आले. पाचोडकडूनही येणारे वाहनही पोलिसांचेच आहे, हे सराईत दरोडेखोरांना कळून चुकले होते.
दरोडेखोरांनी पोलिसांना चकवा देण्यासाठी मोटारसायकल रोडलगतच्या शेतात सोडली व ते लपून बसले. पोलिसांनीही पैठण ते रहाटगावपर्यंतचा टापू पिंजून काढला. मात्र, पोलिसांना दरोडेखोर सापडले नाहीत.
खबर मात्र पक्की असल्याने मोहिमेवरून परतायचे नाही, असे आदेश जाधव यांनी फौजदार तांबोळी, भारती यांना दिले.
पैठण परिसरात सहायक पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी सहकारी घेऊन चोख तटबंदी केलेली होती. आपसात सारखे संदेशवहन पोलिसांत सुरू होते; परंतु सुगावा लागत नव्हता. रात्रीचे दीड वाजून गेले होते. दरोडेखोर याच परिसरात दडून बसले आहेत, हे अण्णासाहेब जाधव यांनी हेरले होते. शेवटी तेथून निघून गेल्याचे नाटक करीत पोलीस अंधारात दबा धरून
बसले.
पोलीस निघून गेले, असा समज होऊन लपून बसलेले दरोडेखोर बाहेर आले व मोटारसायकल रोडवर घेण्यासाठी सरसावले. पोलिसांनी सावज रेंजमध्ये येऊ दिले व अचानक हल्लाबोल केला.
पोलिसांना पाहून गडबडलेल्या दरोडेखोरांनी अंधारात पळ काढला. दरोडेखोर पुढे, पोलीस मागे असा कुडकुडत्या थंडीत पाठलाग सुरू झाला. दोन किलोमीटर पाठलाग करीत एक एक करीत पाचपैकी तीन दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणले आहेत.