पीक कर्जासाठी अवाजवी शुल्काची होतेय आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 00:52 IST2015-04-29T00:33:13+5:302015-04-29T00:52:19+5:30
जालना : बँक आॅफ महाराष्ट्रकडून नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून अवाजवी शुल्क आकाण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष

पीक कर्जासाठी अवाजवी शुल्काची होतेय आकारणी
जालना : बँक आॅफ महाराष्ट्रकडून नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून अवाजवी शुल्क आकाण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी बँकेच्या पुणे येथील अध्यक्षांकडे मंगळवारी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष डोंगरे यांनी म्हटले आहे की, या बँकेच्या विविध शाखांतून जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नेहमी पीक कर्ज घेतात. मागील कर्जाचा नियमित भरणा करून ते नवीन पीक कर्ज घेतात. मागील वर्षापर्यंत पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना केवळ एक रुपयाचे तिकिट लावावे लागत होते. मात्र यंदापासून दीड हजार रुपयांपर्यंतचे विविध प्रकारचे अवाजवी शुल्काचा भरणा करावा लागत आहे. त्यानंतरच नवीन पीक कर्ज दिले जाईल, असे बँकेच्या स्थानिक व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे.
वास्तविक संपूर्ण देशात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जावर व्याज देखील आकारू नये, त्यांना मोफत पीक कर्ज दिले जावे, याकरीता केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र शासनाने तर जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना लागू केली आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून ३ टक्के व्याज सवलत योजना व महाराष्ट्र शासनाकडून २.५ टक्के व्याज सवलत योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे अवाजवी शुल्क आकारून शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये.
उलट शेतकऱ्यांकरीता एखादी सवलतीची योजना लागू करून त्यांना काही मदत करता येईल असे प्रयत्न करावेत, अशी मागणी करून डोंगरे यांनी बँकेने अवाजवी शुल्क आकारणी बंद न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)