गोंदी पोलिस ठाण्याचा कारभार महिनाभरापासून प्रभारी
By Admin | Updated: November 25, 2015 23:16 IST2015-11-25T23:02:01+5:302015-11-25T23:16:40+5:30
राजू छल्लारे , वडीगोद्री अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील एकूण ७५ गावे आणि २८ वाड्यांचा विस्तीर्ण कार्यभार असलेल्या गोंदी पोलिस ठाण्याचा पदभार मागील महिनाभरापासून

गोंदी पोलिस ठाण्याचा कारभार महिनाभरापासून प्रभारी
राजू छल्लारे , वडीगोद्री
अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील एकूण ७५ गावे आणि २८ वाड्यांचा विस्तीर्ण कार्यभार असलेल्या गोंदी पोलिस ठाण्याचा पदभार मागील महिनाभरापासून घनसावंगी पोलिस ठाण्याचा प्रभारीपदभार असलेले सपोनि बांगर यांच्याकडे देण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याकडे दोन ठाण्यांचा प्रभारी पदभार देण्यात आल्याने तपास कामावर परिणाम होत आहे.
गोंदी पोलिस ठाण्यातंर्गत दुनगाव ते मंगरूळ सुमारे ९० कि़ मी. अंतरावरील गोदाकाठची अंबड व घनसावंगी तालुक्यातील ७५ गावे आणि २८ वाड्यांचा कार्यभार आहे. या ठाण्याचा कार्यभार सहाय्यक पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्याकडे आहे. मात्र मागील महिनाभरापासून ते आजारी रजेवर आहेत. ते अद्याप रूजू झालेले नाहीत. या ठाण्याचा कार्यभार घनसावंगी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्याकडे आहे. त्यामुळे बांगर यांच्याकडे घनसावंगी पोलिस ठाण्यातंर्गत असलेली १०३ गावे आणि गोंदी ठाण्यातील १०३ अशा २०६ गावांचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.
गोंदी पोलिस ठाण्याचा विस्तीर्ण कार्यभार असताना तसेच या ठाण्यातंर्गत दोन राष्ट्रीय महामार्ग आहे. यामार्गावर अपघात तसेच लुटमार, चोऱ्या आदी गुन्हेही वाढलेले आहेत. जिल्हा पोलिस दलाने या ठाण्याचा कार्यभार पोलिस निरीक्षकांकडे दिलेला नाही. ठाण्याला मागील काही वर्षांपासून सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकारीच आहे. त्यामुळे ठाण्याला पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी देण्यात यावा, पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी. अशी मागणी होत आहे.