‘गीता’चाही अध्याय संपला

By Admin | Updated: June 25, 2016 00:45 IST2016-06-25T00:25:02+5:302016-06-25T00:45:55+5:30

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात मागील २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारी पांढरी वाघीण ‘गीता’हिने शुक्रवारी सकाळी शेवटचा श्वास घेतला

The chapter of 'Geeta' has ended | ‘गीता’चाही अध्याय संपला

‘गीता’चाही अध्याय संपला


औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात मागील २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणारी पांढरी वाघीण ‘गीता’हिने शुक्रवारी सकाळी शेवटचा श्वास घेतला. वयाच्या १८ व्या वर्षी गीताच्या विविध अवयवांनी साथ देणे सोडून दिले होते. श्वसनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडाची गती मंदावली होती. तिच्या मृत्यूने प्राणि संग्रहालयातील एक पिंजरा पुन्हा एकदा सुनासुना झाला. प्राणिसंग्रहालयात पांढऱ्या वाघांची आता एकच जोडी शिल्लक राहिली आहे.
मनपाने ओरिसाच्या नंदन कानन येथील प्राणिसंग्रहालयातून भानुप्रिया आणि प्रमोद या जोडीला आणले होते. या जोडीने तब्बल नऊ पिलांना जन्म दिला. १८ जानेवारी १९९८ मध्ये त्यांनी गीताला जन्म दिला. जन्मापासून गीता उद्यानातच खेळत बागडत आहे. तिच्या भाऊ, बहिणींना देशभरातील इतर उद्यानांमध्ये पाठविण्यात आले.
मात्र, गीता कुठेच गेली नाही. प्राणिसंग्रहालयात दररोज तिची विशेष काळजी घेण्यात येत होती. केअरटेकर झिया, काळे आणि संजय नंदन यांच्याशी तिची जाम गट्टी होती. त्यांच्या एका आवाजावर ती कोठूनही पळत येत असे. ४ जून रोजी गीता अचानक आजारी पडली. तिच्या आजारपणाचे कारण शोधून काढण्यात आले. रक्ताच्या तपासण्यांचा अहवाल पाहून उद्यानातील डॉक्टरांनाही धक्का बसला. गीताची श्वसनसंस्था, यकृत, मूत्रपिंड काम करीत नसल्याचे निदर्शनास आले. किडनीजवळ ट्युमरची गाठ झाली होती. डॉ. खाजा इनामदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिल्या दिवसापासून गीतावर औषधोपचार सुरू ठेवले. सुरुवातीला औषधोपचाराला ती प्रतिसादही देत होती. गुरुवारी सायंकाळी तिची प्रकृती अधिक खालावली. गीताने पंधरा दिवसांनंतर थोडेसे जेवणही सायंकाळी केले.

केअरटेकरसोबत ती अत्यंत गोडीगुलाबीने वागत होती. त्यानंतर तब्बल १२ तास तिला सतत सलाईनही देण्यात येत होते. सकाळी ६ वाजता गीताने शेवटचा श्वास घेतला.
रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सहायक आयुक्त मनोहर देवरे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पी. एन. पांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. यू. भालेराव, वन विभागाचे एस. आर.भांबळे, सुरेश पुंड यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे, सभापती मोहन मेघावाले, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सध्या सिद्धार्थमध्ये सचिन (वय-१३) आणि राणी (वय-२०) हे दोनच पांढरे वाघ आहेत. इतर वाघांची संख्या ५ आहे. एकूण ७ वाघ उद्यानात आहेत. मनपाने यापूर्वी पुण्याच्या प्राणि संग्रहालयाला एक वाघ दिला आहे.
इंदौर येथील प्राणिसंग्रहालयाला एक जोडी दिली आहे. बोरीवली आणि झारखंड येथेही प्रमोद आणि भानुप्रिया यांची पिल्ले देण्यात आली आहेत. आता मनपा पांढऱ्या वाघांची पिल्ले आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आजारपणामुळे गीताचे वजन कमालीचे घटले होते. साधारण वाघ-वाघिणीचे वजन २०० ते २२५ किलो असते. गीता मरण पावली त्यावेळी तिचे वजन फक्त १२५ किलो होते. नाकापासून शेपटीपर्यंत लांबी २५८ सेंटीमीटर, पुढचे पाय १०७ सें. मी. तर पाठीमागचे पाय ११२ सें. मी. होते. पोटाचा घेर ९८ सें. मी. होता.

Web Title: The chapter of 'Geeta' has ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.