डोनेशन घेणाऱ्या शिक्षण संस्थांना बसणार चपराक
By Admin | Updated: June 15, 2015 00:15 IST2015-06-15T00:15:45+5:302015-06-15T00:15:45+5:30
जालना : २०१५-१६ या नवीन शैक्षणिक वर्षास १५ जूनपासून प्रारंभ होत आहे. शाळा, महाविद्यालयेही सज्ज झाली असून प्रत्येक ठिकाणी सूचना फलकांवर

डोनेशन घेणाऱ्या शिक्षण संस्थांना बसणार चपराक
जालना : २०१५-१६ या नवीन शैक्षणिक वर्षास १५ जूनपासून प्रारंभ होत आहे. शाळा, महाविद्यालयेही सज्ज झाली असून प्रत्येक ठिकाणी सूचना फलकांवर प्रवेशाच्या सूचनेसह वेळापत्रक लावण्यात आल्याचे दिसून आले. शाळांमध्ये प्रवेशासाठी डोनेशन घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने स्वतंत्र पथक तयार केले आहे. स्वत: शिक्षणाधिकारी देखील काही शाळांना अचानक भेटी देणार आहेत.
शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार असल्याने रविवारी दिवसभर बाजारात शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी होती. आज सुटीचा दिवस असला तरी सर्वत्र शैक्षणिक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. दप्तरासह गणवेश, वॉटरबॅग, डब्बे, वह्या इत्यादी साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी डोनेशन घेण्याची चर्चा असते. मात्र शिक्षण विभागाकडून दरवर्षी शैक्षणिक संस्थांनी कोणत्याही प्रकारे डोनेशन घेऊ नये, असे बजावले जाते. तसेच डोनेशन घेतले जात नसल्याचा दावाही केला जातो. यावर्षी मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने डोनेशन घेण्याचे प्रकार ्रकोठे होतात का, यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र पथक स्थापन केले असून त्याविषयीची माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, कोणत्याही शाळेत डोनेशन घेण्याचा प्रकार होत असल्यास पालकांनी तशा प्रकारची तक्रार करावी. आम्ही संबंधित शिक्षण संस्थेविरुद्ध योग्य ती कार्यवाही करू. आपण स्वत: काही शाळांना भेटी देणार का, या प्रश्नावर त्यांनी होकार दर्शविला.
पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरीत केली जाणार आहेत. इंग्रजी शाळांमध्ये दुर्बल घटकातील २५ टक्के पाल्यांच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने संबंधित शाळांना प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम ठरवून दिला असून पहिल्या तुकडीपासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेण्याचा प्रकार झाल्यास संबंधित शिक्षण संस्थेविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असून अशा संस्थांनी प्रवेश देण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार आल्यास आपण स्वत: त्या ठिकाणी जाणार असल्याचे जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती ए.जे. बोराडे यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक वर्षात सर्वशिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जाणार असून शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती सभापती बोराडे यांनी दिली.