गुरूंमुळेच घडले जीवनात परिवर्तन

By Admin | Updated: July 12, 2014 00:45 IST2014-07-12T00:45:36+5:302014-07-12T00:45:36+5:30

हिंगोली : आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.

Changes in life due to gurus | गुरूंमुळेच घडले जीवनात परिवर्तन

गुरूंमुळेच घडले जीवनात परिवर्तन

हिंगोली : आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे, असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे, तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे. असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांना राजा म्हणून ज्याला मानतात. त्या ज्ञानदेवांनीसुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरूवात केली.
अशा या गुरूपौर्णिमेनिमित्त विविध मान्यवरांच्या त्यांच्या गुरूविषयी प्रतिक्रिया...
माझे बाबाच माझे खरे गुरू - रामभाऊ कोळपे
पहिली, दुसरीला असताना मला शिकवायला माझे बाबाच होते. त्यांनी माझा पाया पक्का केला. खरे तर माझे वडीलच माझे खरे गुरू आहेत. त्यांच्यामुळेच मी घडलो असल्याचे कळमनुरी येथील शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ कोळपे यांनी सांगितले. स्वयंशासनदिनी इंग्रजीचा पाठ घेतलो अन् पहिला आलो. तेव्हापासूनच इंग्रजीबद्दल प्रेम निर्माण झाले व आज मी इंग्रजी शिकवितो. हे गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले.
श्रमाचे महत्त्व गुरूकडूनच शिकलो- डॉ. धांडे
कितीही थकले तरी काम करत राहण्याचे श्रम केल्याने जीवनात यशाची शिखरे गाठता येतात. श्रमामुळेच माणूस मोठा होतो, हे मी माझ्या गुरूकडूनच शिकल्याची प्रतिक्रिया कळमनुरी येथील डॉ. आर. एस. धांडे यांनी दिली. माझ्या जीवनात वैद्यकीय व्यवसायात डॉ. विनायक देशमुख व डॉ. नानासाहेब चौधरी या दोन व्यक्ती आल्या. हे दोघे अहोरात्र मेहनत करीत असत. रुग्णांशी कसे बोलायचे? असे वागायचे? हे मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांची कला आत्मसात केल्यामुळे आज या क्षेत्रात यश मिळविता आले. माणसाचे शरीर हे १७ ते १८ तास काम करते. मनावर घेतले तर कोणतेही काम अशक्य नाही. जीवनात जे-जे चांगले मिळाले ते घेत राहिलो. सहनशक्ती, बोलण्याची पद्धत हे गुरूमुळेच मी शिकलो.
गुरूंमुळेच घडलो- अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर
वकील क्षेत्रामध्ये असलेले सामाजिक कार्य करण्यासाठी कुटुंबातील आजोबा व आईवडिलांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर वकील व्यवसायात काम करण्याची संधी अ‍ॅड. वसंत साळुंके व अ‍ॅड. अशोक सोनी यांनी दिली. तेच माझे गुरू आहेत. त्यांनीच मला या क्षेत्रात दाखविलेल्या मार्गामुळे यशस्वी होता आले असल्याची प्रतिक्रिया औंढा वकील संघाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर यांनी दिली.
शिक्षक च माझे गुरू- अब्दुल मन्नान
शिक्षणाची आवड होती. आई-वडिलांची देखील शिक्षण घेईपर्यंत शिकविण्याची इच्छा होती; परंतु परिस्थिती बिकट होती. अशा या कठीण परिस्थितीमध्ये माध्यमिक शिक्षण काळामधील शिक्षक एम.ए. हबीब यांनी धीर दिला. शिक्षण घेण्यासाठी परिपूर्ण मदत केली. त्यांचाच आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात नोकरी करण्याचे ठरविले. त्यांच्या आशीर्वादाने आज औंढा येथील इंदिरा गांधी उर्दू विद्यालयात मुख्याध्यापक आहे.

Web Title: Changes in life due to gurus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.