छत्रपती संभाजीनगर : ३० वर्षांपूर्वी दिमाखात उभ्या राहिलेल्या चाणक्यपुरीस सेवासुविधा देण्याकडे मनपाने कानाडोळा केला आहे. रस्ते वर अन् घरे खाली अशी ही वसाहत बनली आहे. यामुळे सांडपाणी, पावसाचे पाणी थेट घरांत शिरते.
रस्त्यांचे डांबरीकरण व परिस्थितीनुरूप बदल यामुळे आता घरांपेक्षा तीन ते चार फूट रस्त्यांची उंची वाढली आहे. घरात कार असूनही ती घरासमोर पार्क करता येत नाही. काही ठिकाणी उतारावरून घरात येणे-जाणे कठीण ठरते. त्यासाठी कॉलनीच्या मुख्य प्रवेशद्वाराचा उपयोग करावा लागतो. गारखेडा स्टेडियम व शहानूरवाडीकडे रस्त्यावरून भरधाव वाहनाची धडक लागण्याचा धसका रहिवाशांनी घेतला आहे, कारण येथे गतिरोधकच नाही. मोकाट जनावरांनासुद्धा कुणीही अडवू शकत नाही, त्यामुळे वाहनचालकांना दक्षता घ्यावी लागते. अनेक ठिकाणी कचरा पडलेला असतो.
तुंबलेली गटार मोकळी करावीकंपाउंड वाॅलच्या तीन ते चार फुटांपर्यंत घर रोडच्या खाली गेलेले आहे. पावसाचे पाणी घराच्या अंगणात शिरते. सांडपाणी निचरा करणारी गटार जागोजागी चोकअप असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. महापालिकेकडे पत्रव्यवहारही करण्यात आला; परंतु कोणी दखल घेत नाही.- कैलास घोडके, सुरक्षारक्षक
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावारस्त्यावर व नाल्यातील घाणीत मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात असून, अस्वच्छतेच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत. औषध व धूरफवारणी करण्याची आवश्यकता आहे. वाहनांवरून अनेकजण कचरा टाकून निघून जातात. त्यांच्यावर कारवाई व्हावी.- शेख लईक (स्वच्छता कर्मचारी)
अपघात रोखण्यासाठी गतिरोधक टाकावेतरस्ता सुरळीत झाल्याने वाहने सुसाट पळविली जातात. त्यामुळे अपघाताची भीती आहे. परिसरात शाळेमुळे सकाळी, दुपारी गर्दी असते. गतिरोधक टाकावेत.-किशोर पैठणे, सुरक्षारक्षक