बिबट्याने पाडला घोडीचा फडशा
By Admin | Updated: August 11, 2014 01:54 IST2014-08-11T01:22:27+5:302014-08-11T01:54:51+5:30
बारड : मुदखेड तालुक्यातील बारड वनपरीक्षेत्रातील मौजे डोंगरगाव शिवारात बिबट्याने पाळीव घोडीवर हल्ला चढवून फडशा पाडल्याची घटना घडली़

बिबट्याने पाडला घोडीचा फडशा
बारड : मुदखेड तालुक्यातील बारड वनपरीक्षेत्रातील मौजे डोंगरगाव शिवारात बिबट्याने पाळीव घोडीवर हल्ला चढवून फडशा पाडल्याची घटना घडली़
डोंगरगाव शिवारात शेतकरी रामराव सखाराम व्यवहारे यांच्या शेतात १० आॅगस्टच्या पहाटे पाळीव घोडीवर बिबट्याने हल्ला चढविला़ बिबट्या गेल्या दोन महिन्यापासून या परिसरात दडी मारून असल्याने आजपर्यंत त्याने २४ जनावरांच्या शिकारी करून वैजापूर पार्डी येथील शेतकरी रुस्तुम पवार यांच्यावर २३ जून रोजी हल्ला करून जीवघेणा हल्ला केला होता़ सुदैवाने यात ते बचावले़ यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे़ जंगलात पिण्यासाठी पाणी नसल्याने वन्यप्राणी शेताकडे येत असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी आऱएल़ पाटील यांनी दिली़
उपवनसंरक्षक एस़बी़डोडग ल यांच्या मार्गदर्शनानुसार वनपरीक्षेत्र अधिकारी पाटील, वनपाल नाईक, वनरक्षक एम़एम़ पवार, वनरक्षक गोविंद इर्लेवाड, एस़आऱशेख, बी़एस़ बबूलवाड यांनी डोंगरगाव येथे घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला व नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले़ तहसीलदारांच्या आदेशावरून महसूल विभागाने या घटनेची दखल घेवून मंडळ अधिकारी एनक़े़ वाघमारे, तलाठी जी़एच़ठाकूर यांनी पंचनामा केला़ सदर घोडीची किंमत ३ लाख रुपये आहे़
ही घोडी मरेमाय या देवीची आहे़ या घोडीला भक्तीभावाने परिसरातील भक्त मानत असत़ वनविभागाने वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे़ यावेळी विजय पाटील, शिवाजी कस्तुरे, संदीप व्यवहारे, श्रीनिवास महादवाड, पिराजी केदारे, गणेश व्यवहारे, बापूराव कस्तुरे, गजानन देशमुख, दीपक व्यवहारे, सूर्यभान पाटील, भीमराव पुयड, श्यामराव व्यवहारे, गंगाधर व्यवहारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते़
बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असून तो हिंसक आहे़ वनविभागाकडून आम्ही गस्तीसाठी पथक नेमले असून त्याला पकडण्याच्या प्रयत्नात आहोत़ या घोडीची नुकसान भरपाई वनविभागाकडून आठ दिवसात प्रयत्न मिवून देण्याचा प्रयत्न करीन - आऱएल़ पाटील, वनपरीक्षेत्र अधिकारी़ (वार्ताहर)