आव्हाना ग्रामसभेत महिलांनी मांडल्या समस्या
By Admin | Updated: May 7, 2014 23:56 IST2014-05-07T23:55:24+5:302014-05-07T23:56:18+5:30
आव्हाना: भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे १ मे रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेकडे महिलांनी पाठ फिरविल्याबाबत वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायतने त्याची दखल घेवून सभा पुन्हा घेतली.

आव्हाना ग्रामसभेत महिलांनी मांडल्या समस्या
आव्हाना: भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे १ मे रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेकडे महिलांनी पाठ फिरविल्याबाबत वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायतने त्याची दखल घेवून सभा पुन्हा घेतली. या ५ मे रोजी झालेल्या ग्रामसभेस महिलांनी चांगला प्रतिसाद नोंदवून गावच्या अनेक समस्या त्यात मांडल्या. १ मे रोजी मारोती मंदिरात सभा घेण्यात आली; परंतु सभेबाबत अगोदरच माहिती दिलेली नसल्याने महिलांनी सभेकडे पाठ फिरविली. फक्त २३ महिलांनीच या सभेस उपस्थिती दर्शविली होती. याबाबत लोकमतमध्ये ३ मे रोजी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली. ५ मे रोजी पुन्हा सभा घेण्याचे ठरविले. या सभेस महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला. सभेच्या सुरूवातीलाच उपस्थित महिलांनी गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी केली. वैयक्तिक शौचालयाचे पाणी रस्त्यावर येत असल्याने त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांना नोटीस देऊन ही समस्या सोडविण्यात यावी, असे म्हटले. गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करावी. शहरात जाण्यासाठी गावातून बस सुरू करण्यात यावी आदी अनेक समस्या महिलांनी ग्रामसभेत मांडल्या. (वार्ताहर)