पदाधिकाऱ्यांसमोर समस्यांचे आव्हान
By Admin | Updated: November 28, 2014 01:13 IST2014-11-28T00:31:13+5:302014-11-28T01:13:22+5:30
परभणी : महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदी नूतन पदाधिकारी विराजमान झाले असून, या पदाधिकाऱ्यांसमोर शहरातील समस्यांचा डोंगर उभा आहे़

पदाधिकाऱ्यांसमोर समस्यांचे आव्हान
परभणी : महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदी नूतन पदाधिकारी विराजमान झाले असून, या पदाधिकाऱ्यांसमोर शहरातील समस्यांचा डोंगर उभा आहे़ यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांना शहर विकासाकडे नेण्यासाठी आव्हानात्मक काम करावे लागणार आहे़
परभणी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर संगीता वडकर ह्या मनपाच्या दुसऱ्या महापौर ठरल्या आहेत़ तर उपमहापौरपदी काँग्रेसचे भगवानराव वाघमारे विराजमान झाले आहेत़ महानगरपालिकेत रुपांतर झाल्यानंतर शहराचा विकास झपाट्याने होईल, अशी अपेक्षा होती़ परंतु, ती फोल ठरली़ नगरपालिका असताना परभणीकरांचे जे प्रश्न होते ते आजही कायम आहेत़ शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे़ तीस वर्षांच्या जुन्या योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा होतो तो अपुरा ठरत आहे़ त्यामुळे नवी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली़ या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम बरेचसे पूर्ण झाले असून, दुसरा टप्पा मात्र रखडला आहे़ या दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरात जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागा निश्चित करणे आणि जलकुंभांची जागा निश्चित करण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे़ शहरवासियांच्या पाणी प्रश्नाला मनपाने गांभिर्याने घेऊन नवीन योजना तातडीने राबविल्यास नागरिकांची पाण्याची मोठी समस्या कमी होणार आहे़ पाण्याच्या प्रश्नाबरोबरच इतर अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत़ शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे़ त्या तुलनेमध्ये नव्याने मालमत्तांची मोजणी झालेली नाही़ त्यामुळे मनपाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे़ महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवून हा पैसा विकास कामांसाठी वापरता येऊ शकतो़ त्यामुळे मालमत्ता मोजणीच्या कामालाही या पदाधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे़
शहर स्वच्छतेची समस्या देखील आहे़ शहरामध्ये नियमित स्वच्छता होत नाही़ कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे़ स्वच्छतेचे नियोजन केले जात नाही़ त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो़ शहरात अनेक समस्या असल्या तरी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या मुलभूत गरजा सोडविण्याचे आव्हान नुतन महापौर आणि उपमहापौरांसमोर आहे़ (प्रतिनिधी)