निवडणुका निर्विघ्न पार पाडण्याचे श्रीधर यांच्यापुढे आव्हान

By Admin | Updated: January 8, 2017 23:40 IST2017-01-08T23:36:19+5:302017-01-08T23:40:56+5:30

बीड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक गोविंदराजन श्रीधर सोमवारी सकाळी दहा वाजता पदभार स्वीकारणार आहेत.

Challenge to Shridhar to carry out elections smooth | निवडणुका निर्विघ्न पार पाडण्याचे श्रीधर यांच्यापुढे आव्हान

निवडणुका निर्विघ्न पार पाडण्याचे श्रीधर यांच्यापुढे आव्हान

संजय तिपाले  बीड
जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक गोविंदराजन श्रीधर सोमवारी सकाळी दहा वाजता पदभार स्वीकारणार आहेत. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीडमध्ये आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका शांततेत पार पाडण्याचे पहिले आव्हान त्यांच्यापुढे राहील. अवैध धंद्यांचा संपूर्ण सफाया करण्याबरोबरच ‘झिरो करप्शन’साठीही श्रीधर यांना प्रयत्नशील रहावे लागणार आहे.
अधीक्षक अनिल पारसकर यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कालावधीत कर्तव्यदक्ष व ‘नॉन करप्ट’ अधिकारी म्हणून छाप सोडली. ४ जानेवारी रोजी ते बदलीने रायगडला गेले आहेत. त्यांच्या जागी नागपूर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त जी. श्रीधर यांची नियुक्ती झाली. तरुणतूर्क श्रीधर हे मूळचे तामिळनाडू येथील चेन्नईचे रहिवासी आहेत. तीन वर्षांपूर्वी ते औरंगाबाद ग्रामीणला अप्पर अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे मराठवाड्यात कर्तव्य बजावल्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यानंतर त्यांची बदली नागपूरला झाली होती.
सायबर क्राईम व आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात त्यांचा हातखंडा आहे. कार्यतत्पर अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. अधीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक बीडला झाली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर नवे अधीक्षक लाभत असल्याने त्यांच्या कार्यतत्परतेचा कस लागणार आहे. पाच वर्षांपूर्वी जि.प., पं. स. निवडणुका वादाने गाजल्या होत्या. तोडफोड, गोळीबारापर्यंत प्रकरण पोहोचले होते. आता जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. त्यामुळे निवडणूक काळात कोठेही अप्रिय घटना घडणार नाही यादृष्टीने श्रीधर यांना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. पारसकरांनी अवैध धंद्यांना रोख लावण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले. मात्र, काही ठिकाणी छुप्या पद्धतीने मटका, जुगार, दारु हे अवैध व्यवसाय सुरुच होते. या सर्व धंद्यांना शंभर टक्के लगाम घालण्याचे आव्हान श्रीधर यांच्यापुढे आहे.
महिला अत्याचार रोखून नागरिकांमध्ये खाकीचा विश्वास वाढविण्याच्या दृष्टीनेही पावले उचलावी लागतील. राजकीय दबाव झुगारुन गुन्हेगारांवर अंकुश ठेवावा लागणार आहे. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखून लोकाभिमुख कारभाराची श्रीधर यांच्याकडून बीडकरांना अपेक्षा आहे.
पोलिसांचा ताणतणाव कमी करण्यासाठी करावे लागतील उपाय
काही महानगरांत पोलिसांना आठ तास ड्यूटी सुरु झाली आहे. मात्र, बीडमध्ये पोलिसांना वेळी - अवेळी कर्तव्यावर जावे लागते. कामाचे तास कमी होतील तेव्हा होतील;परंतु कर्मचारी तणावमुक्त काम कसे करतील? यासाठी उपाय करावे लागणार आहेत.
आरोग्य तपासणी, मन:शांती, योगशिबीर अशा कार्यक्रमांची रेलचेल ठेवावी लागेल. भ्रष्टाचारमुक्त कामकाज करुन घेताना श्रीधर यांना सर्वांचा विश्वासही संपादन करावा लागणार आहे. बीड शहरातील तिन्ही पोलीस वसाहतींची प्रचंड दुरवस्था आहे. नवीन टू- बीएचके प्रकल्प प्रस्तावित आहे. तो श्रीधर यांना विनाविलंब पूर्णत्वाकडे न्यावा लागणार आहे.

Web Title: Challenge to Shridhar to carry out elections smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.