वादापासून दूर राहून कारभार सुधारण्याचे आव्हान
By Admin | Updated: July 3, 2017 00:56 IST2017-07-03T00:54:32+5:302017-07-03T00:56:28+5:30
बीड : बीड पालिकेतील वादग्रस्त राजकारण आणि ढेपाळलेला कारभार सुधारून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान नवीन मुख्याधिकारी यांच्यासमोर असणार आहे

वादापासून दूर राहून कारभार सुधारण्याचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड पालिकेतील वादग्रस्त राजकारण आणि ढेपाळलेला कारभार सुधारून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान नवीन मुख्याधिकारी यांच्यासमोर असणार आहे. प्रशांत खांडकेकर यांची बदली झाल्यानंतर नवीन मुख्याधिकारी म्हणून धनंजय जावळीकर बीड पालिकेत येत्या तीन दिवसांत रूजू होत असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
बीड पालिकेत पालिका निवडणुकीपासून ‘राजकारण’ सुरू आहे. राजकारणाचे रूपांतर वादात होत आहे. लोकप्रतिनिधींच्या पतींसह लोकप्रतिनिधी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करू लागले आहेत. त्यामुळे पालिकेतील कर्मचारी दहशतीखाली राहून काम करीत आहेत. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर होताना दिसून येत आहे. त्यांच्यातील काम करण्याचा उत्साहाच या राजकारणामुळे कमी झाला आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. स्वच्छता, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधा बीडकरांना वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
या सर्व प्रकारांमुळे ‘बीड पालिका, वादग्रस्त पालिका’ या नावाने चर्चिली जाऊ लागली आहे. परंतु हा धब्बा पुसून काढत शहरातील रखडलेले प्रश्न, नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांना वेळेवर सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान नवीन मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांच्यासमोर असणार आहे.
प्रशांत खांडकेकर हे मागील दोन महिन्यांपासून रजेवर होते. त्यामुळे उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याकडे बीड पालिकेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. नुकताच खांडकेकर यांच्या बदलीचा आदेश निघाला आहे.