डीसीसीवरून राकाँचे पालकमंत्र्यांना आव्हान
By Admin | Updated: June 24, 2014 00:31 IST2014-06-24T00:31:05+5:302014-06-24T00:31:05+5:30
उस्मानाबाद : जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळण्यासाठी वारंवार मागणी करूनही शासनाकडून सापत्न वागणूक देण्यात आली आहे़

डीसीसीवरून राकाँचे पालकमंत्र्यांना आव्हान
उस्मानाबाद : जिल्हा बँकेला आर्थिक मदत मिळण्यासाठी वारंवार मागणी करूनही शासनाकडून सापत्न वागणूक देण्यात आली आहे़ राज्यातील इतर तीन बँकांना शासनाने मदत केली असून, उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत का मिळत नाही? जिल्हा परिषदेचे व्यवहार डीसीसीपासून लांब का ठेवण्यात आले, याचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने एका पत्रकान्वये दिले आहे.
राज्य शासनाने नागपूर बँकेला ९२़९४ कोटी, वर्धा बँकेला १०२़५६ कोटी तर बुलडाणा जिल्हा बँकेला १२४़४ कोटी रूपये अशी एकूण ३१९़५४ कोटी रूपयांची शासकीय भागभांडवलाच्या स्वरूपात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे़ तर यापूर्वी नांदेड जिल्हा बँकेला १०० कोटी, धूळे-नंदूरबार बँकेला ६० कोटी तर जालना बँकेला २० कोटी रूपये अनुदान स्वरूपात मदत केली आहे़ उस्मानाबाद जिल्हा बँकेला शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे, यासाठी वारंवार मागणी करूनही सापत्न भावनेने दुर्लक्ष करण्यात आले आहे़ बँकेने स्वबळावर बँकींग परवाना मिळविला आहे़ तरीही बँकेत चलन तुटवडा कायम आहे़ त्यामुळे राज्य शासनाने इतर जिल्हा बँकांप्रमाणे उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत करणे अपेक्षित आहे़ वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री बँकेस अर्थसहाय्य करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत असताना जिल्हा बँकेला मदत का मिळत नाही, हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी काढलेल्या पत्रकात केले आहे़ तसेच नागपूर जिल्हा परिषदेची विविध खाती डीसीसी बँकेत चालू आहेत़ असे असताना उस्मानाबाद जि.प.चे व्यवहार डीसीसीपासून दूर का? याचाही खुलासा करावा, असे आवाहन करीत जनतेच्या हितासाठी जिल्हा बँक सक्षम करण्याची गरज असल्याचेही पत्रकात म्हटले आहे़
मी सातत्याने पाठपुरावा केला : चव्हाण
राष्ट्रवादीच्या आरोपाबाबत पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उस्मानाबाद जिल्हा बँकेला मदत मिळावी यासाठी खरीप हंगाम बैठकीसह कॅबिनेटमध्ये वारंवार पाठपुरावा केला आहे़ तेरणा व तुळजा भवानी या दोन साखर कारखान्याकडे बँकेचे जवळपास सव्वादोनशे कोटी रूपये कर्ज आहे़ ते वसूल करण्याबाबत शासनाकडून सांगण्यात आले आहे़ राष्ट्रवादीकडून राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप करण्यात येत असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री त्यांचेच आहेत, त्यामुळे बँकेला निधी का मिळत नाही, हे त्यांनाच विचारावे़ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडेच कर्ज आहे, त्यांनी वसूल करून बँकेला द्यावे, असे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सांगितले़