ऑनलाईन चोरीचे पोलिसांसमोर आव्हान
By Admin | Updated: August 31, 2015 13:24 IST2015-08-31T13:21:05+5:302015-08-31T13:24:13+5:30
मोबाईलवर फोन करुन बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवत खात्यावरील पैसे परस्पर लाटण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत.

ऑनलाईन चोरीचे पोलिसांसमोर आव्हान
परभणी : मोबाईलवर फोन करुन बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवत खात्यावरील पैसे परस्पर लाटण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. सहा महिन्यात तब्बल २लाख रुपये अशा पद्धतीने चोरट्यांनी पळविले असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आता या चोरट्यांच्या मागावर आहे.
मोबाईलवर फोन करुन आपण बँक मॅनेजर आहोत, बँकेचे अधिकारी आहोत, अशी बतावणी करीत ग्राहकाच्या बँक खात्याची माहिती, १६ आकडी एटीएमचा क्रमांक आदी गोपनीय माहिती मिळवून ग्राहकाच्या खात्यावरील पैसे परस्पर उचलल्याच्या घटना घडल्या आहेत. ऑनलाईन पैसे चोरीच्या वाढत्या प्रकारामुळे पोलिस यंत्रणाही आरोपींच्या शोधासाठी सर्व बाजूने प्रयत्न करीत आहेत. परंतु, ज्या क्रमांकावरुन असे फोन येतात, हे सर्वमोबाईल बनावट ओळखपत्रांच्या आधारे तयार केले असल्याने पोलिसांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. सहा महिन्यांत अशा प्रकारे चोरीच्या सात घटना घडल्या आहेत. या घटनांमधून २लाख ८ हजार ८५0रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. विशेष म्हणजे, खात्यातील पैसे न उचलता ऑन लाईन शॉपिंग केल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन
■ अनोळखी फोन क्रमांकावरुन कोणी बँक खाते किंवा एटीएम विषयीची गोपनीय माहिती विचारत असल्यास अशा फोन कॉलवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. ४/ आपण बक्षीस जिंकले आहे, असा फोन करणार्या किंवा फसवे मॅसेज पाठविणार्यांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व संबंधितांना कोणतीही माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले आहे.