‘चक्का जाम’.. प्रशासनाला घाम..!
By Admin | Updated: January 31, 2017 23:30 IST2017-01-31T23:21:28+5:302017-01-31T23:30:24+5:30
बीड :आवेशपूर्ण वातावरणात मंगळवारी जिल्हाभर मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन झाले.

‘चक्का जाम’.. प्रशासनाला घाम..!
डौलात फडकणारे भगवे झेंडे.... डोक्यावर ‘एक मराठा- लाख मराठा’ असा संदेश असलेल्या टोप्या.... छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष अन् आरक्षण आमच्या हक्काचे....!, एकच मिशन... मराठा आरक्षण अशा घोषणांनी दुमदुमलेला आसमंत... अशा आवेशपूर्ण वातावरणात मंगळवारी जिल्हाभर मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन झाले. प्रशासनाला घाम फोडणाऱ्या या आंदोलनाला जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने भरउन्हात रस्त्यावर ठिय्या दिला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.
मंगळवारी सकाळी ११ वाजता बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समाजबांधव एकवटले. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊवंदना घेण्यात आली. यावेळी पक्ष, संघटनांचे जोडे बाजूला ठेवून पदाधिकाऱ्यांनी एकीचे दर्शन घडविले. चौकाच्या चारही रस्त्यांवर समाजबांधवांनी ठिय्या देत प्रचंड घोषणाबाजी केली. महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. कोणाच्या नेतृत्वाशिवाय झालेल्या या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने हजारोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. ‘एकच मिशन, मराठा आरक्षण...’ आरक्षण देत कसे नाहीत, घेतल्याशिवाय राहणार नाहीत... कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी झालीच पाहिजे...अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये बदल झालाच पाहिजे...अशा घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचाही जयघोष करण्यात आला. दुपारी १ वाजता राष्ट्रगीत घेऊन चक्काजाम आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनाच्या अनुषंगाने बशीरगंज, तहसील कार्यालय, मोंढा नाका, बार्शी नाका येथून दुचाकी वाहने वळविण्यात आली होती. रस्त्यावर रिक्षा व स्थानिकचे मालवाहू वाहने धावली नाहीत. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळाला. दुपारनंतर जनजीवन पूर्वपदावर आले.
बीड तालुक्यातील घाटसावळी, पेंडगाव, म्हाळस जवळा, मांजरसुंबा, नेकनूर येथेही आंदोलने झाली.
गेवराई, पाटोदा, माजलगाव, धारुर, अंबाजोगाई, परळी, आष्टी, शिरुर, वडवणी, केज येथेही आंदोलन झाले. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
वाहने अडकली
चक्काजाम आंदोलनामुळे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. बीडमध्ये बसस्थानक व बार्शी रोडवर मालवाहू वाहने अडकून पडली होती. सकाळी ११ वाजता सुरु झालेले आंदोलन दुपारी १ वाजेपर्यंत चालले.
क्रांती मोर्चाची चक्काजामवर छाप
मराठा समाजाच्या चक्काजाम आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते.
सकाळपासून ठिकठिकाणच्या आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी नेमला होता. मराठा क्रांती मोर्चात दिसलेल्या स्वयंशिस्तीची छाप चक्काजाम आंदोलनातही दिसून आली. एकाचवेळी हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले ;पण एकही अप्रिय घटना घडली नाही.
धारुर दोन तास ठप्प
धारुरात मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या आंदोलनास मुस्लिम व बहुजन समाजानेही पाठिंबा दिला. घोषणांनी परिसर दणाणला. समारोपप्रसंगी गांजपूरचे भूमिपुत्र शहीद जवान विकास समुद्रे यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तालुक्यातील चोरंबा, तेलगाव, अंबेवडगाव, अंजनडोह येथेही चक्काजाम आंदोलन झाले. यामुळे ठिकठिकाणी प्रवासी अडकून पडले.
आर्वीत आंदोलनाला प्रतिसाद
मंगळवारी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला शिरूर तालुक्यातील आर्वी येथे नागरिकांनी तासभर रास्ता रोको करून प्रतिसाद दिला. गावकऱ्यांनी व्यवहार बंद ठेऊन पाठिंबा दर्शवला. शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी समयोचित भाषणेही झाली. तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
घोषणाबाजीने आंदोलनात उत्साह
या आंदोलनात १२ वर्षीय ज्ञानेश्वर सोळुंके हा विद्यार्थीही सक्रिय सहभागी झाला होता. अत्यंत त्वेषाने घोषणाबाजी करून आंदोलकांत उत्साह भरविण्याचे काम त्याने केले. आरक्षण, कोपर्डी प्रकरण, शेतीमालाला भाव या सर्व मुद्द्यांवर त्याने प्रभावीपणे मत मांडले.
वडवणीत दोन तास आंदोलन
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यमार्गावर चक्काजाम करण्यात आला. सकाळी ११ ते दुपारी १ असे दोन तास आंदोलन झाले. घोषणांनी परिसर दणाणला. मुलींच्या हस्ते नायब तहसीलदार एस. डी. रत्नपारखी यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील कुप्पा, मोरवडफाटा येथेही आंदोलन झाले. घाटनांदूरमध्येही आंदोलन
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम आंदोलन झाले. भर उन्हात मराठा समाज बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बालकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिजाऊ वंदना घेण्यात आली. वक्रतुंड बचतगटाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. पट्टीवडगाव, भानवाडी, जोडवाडी, वाकडी, साळुंकवाडी, मुरंबी, चोथेवाडी येथील मराठा बांधव उपस्थित होते.
पाटोद्यात उत्स्फूर्तपणे आंदोलन
शहरासह खेड्यापाड्यातही चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्वयंस्फूतीने समाजबांधव रस्त्यावर उतरला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनास हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवला. चुंबळी फाटा, लिंबादेवी, पिंपळवंडी, अंमळनेर, पांढरवाडी फाटा येथेही आंदोलन झाले. चक्काजाममुळे वाहतूक ठप्प होती. (प्रतिनिधी)