हिंगोली : चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने आरोपी विष्णू मारोती वीरकर (वय ३०, रा. सेलगाव, ता. सोनपेठ, जि. परभणी) यास १ वर्ष सक्तमजुरी व ४ हजार रुपये दंड ठोठावला आहे. सेनगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी हा निकाल दिला.वायचाळ पिंपरी येथील ९ मे २०१५ रोजी सकाळी १० वाजता विष्णू वीरकर याने पत्नी अनिता हिच्या चारित्र्यावर संशय घेवून ‘तू नांदायला का येत नाही? असे म्हणून खिशातून चाकू काढून तिच्यावर वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने अनिता वीरकर हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची आई रत्नाबाई रामचंद्र देवकर यांनी त्याचदिवशी गोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी विष्णू मारोती वीरकर याच्याविरुद्ध कलम ४५२, ३२४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन फौजदार एन. व्ही. मोरे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला सेनगावच्या न्यायालयात चालला. सरकारी पक्षातर्फे अनिता वीरकर, विश्वनाथ सीताराम देवकर, काळूराम किसनराव देवकर, एम. डी. अध्याय, फौजदार मोरे या सहा जणांची साक्ष नोंदविण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कुरेश यांनी २५ फेब्रुवारीला निकाल दिला. यात कलम ४५२ भादंविनुसार आरोपी विष्णू विरकर यास १ वर्षे सक्तमजुरी व ४ हजार रुपये दंड, कलम ३२४ भादंविनुसार सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. शारदा भट्ट यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
चाकूहल्ल्यातील आरोपीस ६ महिने सक्तमजुरी
By admin | Updated: February 27, 2016 00:15 IST