छत्रपती संभाजीनगर : सिडको एन ४ भागांतून ४ फेब्रुवारीच्या रात्री सात वर्षीय चैतन्य तुपे या चिमुकल्याचे अपहरण करून दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात आठवा आरोपी रविवारी (दि.१६) गजाआड केला. संकेत ऊर्फ गणेश पंढरी शेवत्रे (१९, रा. ब्रम्हपुरी ता. जाफराबाद, जि. जालना) असे आरोपीचे नाव असून, त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे आणि दिली.
टोळीतील मुख्य आरोपी हर्षल शेवत्रे, जीवन शेवत्रे, प्रणव शेवत्रे, कृष्णा पठाडे, शिवराज ऊर्फ बंटी गायकवाड, हर्षल चव्हाण आणि विवेक ऊर्फ साजन विभुती भूषण ऊर्फ महोतो (२५, रा. बिहार) अशा सात जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. दरम्यान, संकेत हा हर्षल शेवत्रेचा सख्खा भाऊ आहे. हर्षल शेवत्रे टोळीने चैतन्यचे अपहरण करून कारने पळून जाताना त्यांचा भोकरदनजवळ अपघात झाला होता. त्यानंतर तेथून दुसऱ्या वाहनाने हर्षल चैतन्यला घेऊन ब्रह्मपुरी गावात गेला. त्यावेळी त्याचा भाऊ संकेत यानेच त्या दोघांना दुचाकीवर बसवून शेतात सोडले होते. संकेत देखील अपहरणाच्या कटात सहभागी असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पुंडलिकनगर ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे करत आहेत.