सभापती, उपसभापती निवडीची उत्सुकता शिगेला !
By Admin | Updated: March 12, 2017 23:12 IST2017-03-12T23:10:49+5:302017-03-12T23:12:09+5:30
कळंब : १४ मार्च रोजी कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतीपदाचा फैसला होणार असल्याने याबाबची मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे

सभापती, उपसभापती निवडीची उत्सुकता शिगेला !
कळंब : १४ मार्च रोजी कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतीपदाचा फैसला होणार असल्याने याबाबची मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. सभापतीपदासाठी गुणवंत साहेबराव पवार, तर उपसभापतीपदासाठी प्रभावती भागवत आडसूळ यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
कळंब पं.स.मध्ये १६ पैकी १० जागा जिंकून राष्ट्रवादीने एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. मागील पाच वर्षे सेनेच्या ताब्यात पंचायत समिती होती. त्या काळात येरमाळा, दहिफळ या गणाकडे प्रत्येकी अडीच वर्षे, तर इटकूर व मस्सा (खं) या गणांकडे उपसभातीपद होते. या निवडणुकीत सेनेच्या संख्याबळ घसरून सहावर आल्याने सभापती-उपसभापतीपद निर्विवादपणे राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार असल्याचे स्पष्ट आहे. या पदासाठी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीकडून सर्वसाधारण प्रवर्गातून तीन, तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून चार असे सात उमेदवार या दोन्ही पदासाठी आहेत. या जागांवर आपल्याच गटाच्या सदस्यांची वर्णी लागावी यासाठी तालुका पातळीवर राष्ट्रवादीतील सर्वच गट पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरून आहेत. यासाठी प्रत्येकी १० महिने सभापती-उपसभापतीपदाचा बाजार समिती फॉर्म्युलाही पुढे करण्यात आला आहे. याबाबत पक्षाचे जिल्हास्तरीय नेतृत्वही अनुकूल असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे. पं.स. सभापतीपदासाठी बाजार समिती फॉर्म्युला केला, तर या दोन्ही पदांवर सहा जणांचा पहिल्या अडीच वर्षात काम करण्याची संधी मिळणार आहे, तसेच पक्षांतर्गत नाराजीही टाळता येणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? त्यावरच या फॉर्म्युल्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. कळंब पं.स.च्या माध्यमातून तालुक्यातील जवळपास ९५ गावांवर लक्ष ठेवता येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता या पदावर सक्षम व जनसंपर्क असणाऱ्या पं.स. सदस्या संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांधून होत आहे. सेना-काँग्रेसच्या पं.स. मधील सत्ताकाळात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतला दुजाभावाची वागणूक मिळाली होती. तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी सक्षम पदाधिकारी यावेत, अशी मागणी पक्षातून होते आहे.(वार्ताहर)