जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पडद्यामागे घडामोडी सुरु

By Admin | Updated: September 11, 2014 00:06 IST2014-09-10T23:49:00+5:302014-09-11T00:06:21+5:30

परभणी: येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी आता दिग्गज राजकीय मंडळी कामाला लागली आहे.

For the chairmanship of the Zilla Parishad, the activities started following the scenes | जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पडद्यामागे घडामोडी सुरु

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पडद्यामागे घडामोडी सुरु

परभणी: येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी आता दिग्गज राजकीय मंडळी कामाला लागली आहे. या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे.
परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. मिनी मंत्रालय असलेल्या जि.प. चे व राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले हे पद मिळविण्यासाठी जिल्ह्यातील विविध गट-तट कामाला लागले आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली तरी पुढील अध्यक्षपद मिळविण्यासाठी आता विरोधी पक्षातील सदस्यही चाचपणी करु लागले आहेत. यामधूनच बऱ्याचश्या पडद्यामागील घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत एकत्र आलेली नेते मंडळी पुन्हा एकदा जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकत्र येणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे दुसरा गट अस्वस्थ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या अधिक असली तरी जिल्हाध्यक्ष विजय भांबळे व आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या मर्जीतील व्यक्तीची अध्यक्षपदासाठी वर्णी लागू शकते. राज्यभर काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी असली तरी परभणी जिल्हा परिषदेत मात्र हेच दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत विरोध करायचा आणि लोकसभा- विधानसभेला एकाच व्यासपीठावरुन भाषण ठोकायचे, अशीच काहीशी स्थिती जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम जाणवणार आहे. विशेष म्हणजे यावेळी दिग्गजांचा ‘पाथरी पॅटर्न’ काय करेल? याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीला १० दिवसांचा कालावधी राहिला आहे. या दहा दिवसांत बऱ्याच घडामोडी घडणार असून त्या जिल्ह्याच्या राजकारणावर परिणामकारक ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नेतेमंडळी सावधपणे व या राजकारणाचा विधानसभेला कसा लाभ मिळेल, या दृष्टिकोनातून पाऊले उचलताना दिसून येत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: For the chairmanship of the Zilla Parishad, the activities started following the scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.