विजय झोलचे केडन्स संघाविरुद्ध शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:51 IST2018-05-13T00:51:24+5:302018-05-13T00:51:59+5:30
मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज विजय झोल याने शनिवारी झुंजार शतकी खेळी करताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुणे येथे सुरू असलेल्या सीनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत कर्णधाराला साजेशी शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीमुळे अध्यक्षीय एकादश संघाला पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतरही केडन्सविरुद्ध ही लढत अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवता आले. लातूरच्या अभिलाष लोखंडे याने ६ बळी घेत या सामन्यात आपला विशेष ठसा उमटवला.

विजय झोलचे केडन्स संघाविरुद्ध शतक
औरंगाबाद : मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज विजय झोल याने शनिवारी झुंजार शतकी खेळी करताना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुणे येथे सुरू असलेल्या सीनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत कर्णधाराला साजेशी शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीमुळे अध्यक्षीय एकादश संघाला पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतरही केडन्सविरुद्ध ही लढत अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवता आले. लातूरच्या अभिलाष लोखंडे याने ६ बळी घेत या सामन्यात आपला विशेष ठसा उमटवला.
केडन्स संघाने अध्यक्षीय एकादश संघाला पहिल्या डावात १११ धावांत गुंडाळले. अध्यक्षीय संघाकडून अविनाश शिंदेने सर्वाधिक ३७ धावा केल्या. केडन्सकडून इझान सय्यदने ३५ धावांत ५ गडी बाद केले. त्यानंतर प्रत्युत्तरात केडन्सने पहिल्या डावात २८१ धावा करीत १७० धावांची आघाडी घेतली. त्यांच्याकडून अक्षय वाईकरने ८४, पारस रत्नपारखीने ४८, प्रयाग भाटीने ४० व कर्णधार हर्षद खडीवालेने ३० धावा केल्या. अध्यक्षीय एकादशकडून लातूरच्या अभिलाष लोखंडे याने ८५ धावांत ६ गडी बाद केले. हिंगोलीच्या सन्नी पंडितने ८१ धावांत २ बळी घेतले. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर कर्णधार विजय झोलच्या शतकी खेळीच्या बळावर अध्यक्षीय संघाने दुसऱ्या डावात ९ बाद २८९ धावा करीत केडन्सला निर्णायक विजयापासून रोखण्यात यश मिळवले. २ बाद २४ अशी परिस्थिती असताना विजय झोलने आॅस्टीन लॉजरीस याच्या साथीने निर्णायक ठरणारी दुसºया गड्यासाठी ११२ धावांची भागीदारी केली. विजय झोलने १४४ चेंडूंना सामोरे जाताना १६ खणखणीत चौकारांसह ११७ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे या सत्रातील विजय झोलचे केडन्सविरुद्ध दुसरे शतक आहे. विजय झोल याच्याशिवाय ऋषिकेश सोनवणे याने ७२, आॅस्टीन लॉजरीसने ४९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. केडन्सकडून समद फल्लाह व अक्षय वाईकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
अध्यक्षीय एकादश संघ (पहिला डाव) : ३२ षटकांत सर्वबाद १११. दुसरा डाव : ९ बाद २८९. (विजय झोल ११७, ऋषिकेश सोनवणे ७२, आॅस्टीन लॉजरीस ४९. समद फल्लाह ३/५७, अक्षय वाईकर ३/६७).
केडन्स (पहिला डाव) : ६१.३ षटकांत सर्वबाद २८१. (अक्षय वाईकर ८४, पारस रत्नपारखी ४८, प्रयाग भाटी ४०, हर्षद खडीवाले ३०. अभिलाष लोखंडे ६/८५, सन्नी पंडित २/८१).