केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने केली निम्न दूधनाची पाहणी
By Admin | Updated: December 16, 2015 23:31 IST2015-12-16T23:19:23+5:302015-12-16T23:31:00+5:30
परभणी : दिल्ली येथे केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने सोमवारी जिल्ह्यातील निम्न दूधना प्रकल्पाची पाहणी करून रखडलेले कामे पूर्ण करण्यासंदर्भात निर्देश दिले़

केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने केली निम्न दूधनाची पाहणी
परभणी : दिल्ली येथे केंद्रीय जल आयोगाच्या पथकाने सोमवारी जिल्ह्यातील निम्न दूधना प्रकल्पाची पाहणी करून रखडलेले कामे पूर्ण करण्यासंदर्भात निर्देश दिले़ पथकाच्या भेटीमुळे निधी उपलब्ध होऊन प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लागेल, असा आशावाद निर्माण झाला आहे़
पंतप्रधान सिंचाई लाभ योजनेत देशभरातील २३ पाटबंधारे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे़ त्यात राज्यातील ७ आणि परभणी जिल्ह्यातील सेलू येथील निम्न दूधना प्रकल्पाचा समावेश आहे़ त्यामुळे १४ डिसेंबर रोजी या पथकाने निम्न दूधना प्रकल्पास भेट देऊन डावा व उजवा कालव्याचे काम आणि धरण कामाची पाहणी केली़
या पथकामध्ये दिल्ली येथील केंद्रीय जल आयोगाचे मूल्यांकन संचालक बी़ के ़ कारजी, नागपूर कार्यालयाचे संचालक आऱ डी़ देशपांडे यांचा समावेश होता़ निम्न दूधना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता एऩ व्ही़ शिंदे, कार्यकारी अभियंता डी़ बी़ पांडे, आऱ बी़ सोमवंशी, शाखा अभियंता मंगल पांडे यांनी प्रकल्पाविषयी पथकाला माहिती दिली़
सध्या दुष्काळी परिस्थिती असून, प्रकल्पातील पाण्याचे नियोजन केले आहे, असे सांगितले़ त्यावर पथकाने समाधान व्यक्त केले़ यावेळी झरी येथील प्रगतीशील शेतकरी कांतराव देशमुख यांनीही विशेष पथकाची भेट घेऊन हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली़ सदरील प्रकल्प मार्च २०१७ पर्यंत पूर्ण होणे शक्य असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)