केंद्रीय पथक परतले औरंगाबादेतूनच माघारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 23:53 IST2017-01-08T23:52:38+5:302017-01-08T23:53:22+5:30
जालना : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची १४ हजार ३० कामे पाच वर्षांपासून रखडली आहेत.

केंद्रीय पथक परतले औरंगाबादेतूनच माघारी?
जालना : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची १४ हजार ३० कामे पाच वर्षांपासून रखडली आहेत. दरम्यान, या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक ५ ते ७ जानेवारी याकळात येणार होते. मात्र, हे पथक औरंगबाद येथूनच दिल्लीला परतल्याची माहिती सूत्रानी दिली. असे असले तरी हे पथक अचानक कधीही पाहणीसाठी येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात चार वर्षांपासून सतत दुष्काळी वातावरण होते. दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकारने तहसील कार्यालय,पंचायत समिती, कृषि विभाग, सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग, वनविभाग, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनीक बांधकाम विभाग, रेशीम उद्योग आदी विभागांमार्फत तसेच ग्रामपंचायत स्तरावर कामे करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्यात मंजूर कामांच्या ५८ टक्केच कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ४२ टक्के कामे प्रलंबित आहेत. यातील बहुतांश कामे हे अर्धवट आहेत. पैकी काही कामांबाबत गंभीर तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या आहेत.
यात सर्वाधिक कामे सिंचन विहिरींची अर्धवट आहेत. तर काही ठिकाणी कामे मंजूर होऊनही अद्याप सुरूच झालेली नाहीत. काहीनी एका गटात मंजुरी असताना दुसऱ्या गटात काम सुरू केले आहे. काही कामे निधीअभावी, तर काही तांत्रिक कारणांमुळे रखडली आहेत. याबाबत लोकमतने विशेष पान प्रकाशित करून मग्रारोहयोच्या कामांचे पितळ उघडे पाडले होते. त्याची वरीष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली. त्यामुळेच प्रलंबित कामांच्या व सद्यस्थितीतील कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जालन्यात येणार होते. मात्र, ते औरंगाबाद येथूनच परतले. (प्रतिनिधी)