मध्यवर्ती, सिडको बसस्थानक पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:14 IST2018-01-04T00:14:19+5:302018-01-04T00:14:22+5:30
शहरासह अन्य ठिकाणची गेल्या दोन दिवसांतील परिस्थिती आणि महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी बुधवारी (दि.३) प्रवास करण्याचे टाळले. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक दिवसभर ओस पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत बस आगारातच उभ्या राहिल्या. रेल्वेस्टेशनवरही नेहमीपेक्षा प्रवाशांची गर्दी कमीच दिसून आली.

मध्यवर्ती, सिडको बसस्थानक पडले ओस
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरासह अन्य ठिकाणची गेल्या दोन दिवसांतील परिस्थिती आणि महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी बुधवारी (दि.३) प्रवास करण्याचे टाळले. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक दिवसभर ओस पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत बस आगारातच उभ्या राहिल्या. रेल्वेस्टेशनवरही नेहमीपेक्षा प्रवाशांची गर्दी कमीच दिसून आली.
दररोज प्रवाशांच्या गर्दीने गजबजणारे मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकावर बुधवारी सक ाळपासूनच शुकशुकाट होता. प्रवाशांच्या सुविधेसाठी पोलीस बंदोबस्तात बस सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने केली होती; परंतु दिवसभर वाट बघूनही बस सोडण्याची वेळ आली नाही. प्रवाशांनी नियोजित प्रवास रद्द करण्यावर भर दिल्याचे दिसून आले. बसस्थानकात तुरळक प्रवासी दिसून येत होते. बस सुटण्याच्या आशेने ते तासन्तास बसस्थानकात बसून होते. प्रवाशांच्या पुरेशा संख्येअभावी बस सोडण्याचे टाळण्यात आले. चालक-वाहक कर्तव्यावर हजर होते; परंतु बससेवा ठप्प असल्याने कर्मचारी गटागटाने चर्चा करताना दिसून आले.
एसटी महामंडळातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचाºयांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. पुण्याला जाणाºया शिवनेरी बस रद्द झाल्याने प्रवाशांना तिकिटाचा परतावा देण्यात आला. वेरूळसाठी दोन बस रवाना झाल्याचे मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक स्वप्नील धनाड यांनी सांगितले. शहर बसही बंद ठेवल्याची माहिती सिडको बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक प्रवीण भोंडवे यांनी दिली. दुसरीकडे रेल्वेस्टेशनवरील (पान २ वर)
१,८५३ फेºया रद्द, ४६ लाखांचे नुकसान
जिल्ह्यात बुधवारी एसटी महामंडळाच्या बसच्या दुपारी २ वाजेपर्यंत १ हजार ८५३ फेºया रद्द झाल्या. यातून महामंडळाचे ४६.६२ लाखांचे उत्पन्न बुडाले. जिल्ह्यातील पाचशे बस दुपारपर्यंत आगारातच उभ्या होत्या, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांनी दिली.
लोहमार्ग पोलीस, ‘आरपीएफ’ची धावपळ
मुंबईहून नांदेडकडे जाणाºया तपोवन एक्स्प्रेसवर दुपारी बनेवाडी परिसरात दगडफेक झाली असून, याठिकाणी मोठा जमाव जमल्याची माहिती स्टेशन व्यवस्थापक एल.के. जाखडे यांना मिळाली. दुपारी २.३० वाजता मुंबईकडे जाणारी तपोवन एक्स्प्रेस रवाना होणार होती. त्यामुळे खबरदारी घेत जाखडे यांनी ही माहिती लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाºयांना दिली.
माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप साबळे, सहायक पोलीस निरीक्षक सागर गोडे, पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंद शर्मा यांच्यासह लोहमार्ग आणि ‘आरपीएफ ’चे कर्मचारी बनेवाडीकडे रवाना झाले. या ठिकाणी रेल्वे रुळावर टायर जाळण्यात आले होते. ते हटवून बंदोबस्तात रेल्वे रवाना केल्याचे निरीक्षक अरविंद शर्मा यांनी सांगितले.