सभापतीपदासाठी मध्य, पश्चिम मतदारसंघात रस्सीखेच
By Admin | Updated: May 22, 2014 00:56 IST2014-05-22T00:44:42+5:302014-05-22T00:56:23+5:30
औरंगाबाद : महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी मध्य आणि पश्चिम मतदारसंघात रस्सीखेच सुरू आहे.

सभापतीपदासाठी मध्य, पश्चिम मतदारसंघात रस्सीखेच
औरंगाबाद : महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी मध्य आणि पश्चिम मतदारसंघात रस्सीखेच सुरू आहे. जगदीश सिद्ध आणि त्र्यंबक तुपे यांच्यासह आ. संजय शिरसाठ यांचे समर्थक विजय वाघचौरे यांची नावे चर्चेत आहेत. आ. प्रदीप जैस्वाल यांच्या मतदारसंघात सभापतीपद दिले तर सिद्ध यांची वर्णी लागेल. पश्चिममधून तुपे यांचे नाव आघाडीवर आहे. सभागृह नेतापदासाठी किशोर नागरे यांचे नाव चर्चेत आहे. दोन्ही मतदारसंघांत एकेक पद देण्यात येणार आहे. सध्या सिद्ध यांचे नाव पुढे असून, त्यांचेच नाव अंतिम झाल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात येत आहे. स्थायी समितीत मर्जीतील नगरसेवकांची वर्णी लावण्यात अपयश आल्यामुळे सेनेतील एका नेता गटाचे पित्त आधीच खवळलेले आहे. सिद्ध किंवा तुपे यांच्यापैकी एकाची सभापतीपदावर वर्णी लावण्यात याप्रकरणी मातोश्रीवर निर्णय होणार आहे. सिद्ध यांना खा. खैरे यांनी सभापती करण्याचा शब्द दिला आहे. आ.जैस्वालदेखील त्यांच्या बाजूने आहेत. महापालिकेचे हे शेवटचे वर्ष आहे. पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहे. त्यामुळे या वर्षात अभ्यासू नगरसेवक सभापतीपदावर बसविल्यास युतीला फायदा होईल. महापालिका सभागृह नेतेपदाचा विषय सध्या अडगळीला पडला आहे. खा. चंद्रकांत खैरे यांनी नगरसेवक किशोर नागरे यांचे नाव लावून धरले आहे. मात्र, ३० एप्रिल रोजी स्थायी समिती सदस्यांची निवड झाली. सभागृह नेतेपदाचा विषय त्या दिवशी पुढे ढकलण्यात आला. आ. प्रदीप जैस्वाल यांनी समीर राजूरकर यांना स्थायी समितीमध्ये पाठविण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, त्यांचा प्रयोग यशस्वी झाला नाही. त्यामुळे राजूरकर यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. राजूरकर यांच्या नावाला सेनेच्या एका गटातून काहीही विरोध नाही. आ. जैस्वाल म्हणाले... मध्य किंवा पश्चिम असा काहीही वाद नाही. पक्षनेतृत्व ज्या नगरसेवकाला संधी देईल, तो सभापती होईल. कुणालाही संधी मिळाली तरी त्याला सभापती म्हणून निवडून आणणे हीच मुख्य जबाबदारी असेल. असे आ. प्रदीप जैस्वाल म्हणाले.