छत्रपती संभाजीनगर : शहरात रोज नागरिकांना लुटले जात असताना आता मध्यवर्ती बसस्थानक व सिडको बसस्थानकावरील प्रवासी देखील असुरक्षित झाले आहेत. २७ एप्रिल रोजी पहाटे ३:३० वाजता बसस्थानकावर उतरलेल्या प्रवीण शेजूळ (३०, रा. इंदिरानगर) यांना दोघांनी मारहाण करून गळ्याला चाकू लावून लुटले. मात्र, पोलिस अद्यापही ही लुटमार थांबवण्यात अपयशी ठरले आहेत.
प्रवीण कामानिमित्त अहिल्यानगरला गेले होते. २७ एप्रिल रोजी पहाटे ३:३० वाजता ते अहिल्यानगरहून मध्यवर्ती बसस्थानकावर उतरले. त्यांचा घाटीत उपचार घेतलेल्या भावाला त्यांना भेटण्यासाठी जायचे असल्याने ते बसस्थानकाबाहेर आले. मात्र, तेथे गेटवरच त्यांना दोघांनी अडवले. खिशात जे असेल ते काढ, असे म्हणत एकाने थेट त्यांच्या गळ्याला चाकू लावला. दुसऱ्याने मारहाण करत खिशात हात घालून मोबाइल काढून पळून गेले. क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिडको बसस्थानकातही गुन्हेगारांचा वावरसिडको बसस्थानकात देखील गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. २१ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता मनोज झिंजुर्डे (२१, रा. देवगाव, पैठण) या तरुणाला तिघांनी अडवून मारहाण करत त्याचा मोबाइल व १० हजार राेख रक्कम लुटण्यात आली.
पोलिसांना गांभीर्यच नाहीशहरात दिवसाला किमान ३ ते ४ नागरिकांना लुटले जात आहे. यात प्रामुख्याने रात्री ११ ते पहाटे ५ च्या दरम्यान नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. अनेक घटनांमध्ये मोबाइल देखील लुटले गेले. मात्र, त्याचाही तांत्रिक तपास केला गेला नाही. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा दर्जाच खराब असल्याने त्याचाही उपयोग होत नसल्याचे पोलिस सांगतात. यात स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा देखील ही लूटमार थांबवण्यात अपयशी ठरत असल्याने कार्यशैलीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.