सेनेत गटबाजीला खतपाणी
By Admin | Updated: November 27, 2014 01:10 IST2014-11-27T01:02:29+5:302014-11-27T01:10:00+5:30
औरंगाबाद : शिवसेनेत गटबाजीला खतपाणी घालण्याचा प्रकार आता जोमाने सुरू झाला असून खा. चंद्रकांत खैरे यांच्या गैरहजेरीत आज महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी

सेनेत गटबाजीला खतपाणी
औरंगाबाद : शिवसेनेत गटबाजीला खतपाणी घालण्याचा प्रकार आता जोमाने सुरू झाला असून खा. चंद्रकांत खैरे यांच्या गैरहजेरीत आज महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी जुन्या अडगळीला पडलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला.
संपर्क नेते विनोद घोसाळकर यांनी तर खा. खैरे अधिवेशनासाठी दिल्लीला आहेत, आमच्यात भांडणे लावून देण्याचा प्रयत्न माध्यमांनी करू नये, असा खुलासा करीत खैरे गैरहजर असल्याचे सर्वांच्या लक्षात आणून दिले. मुंबईतील मंडळीच पक्षात गटबाजीला खतपाणी घालीत असल्याचा सूर काही जणांनी यावेळी आळविला.
माजी महापौर शीला गुंजाळे, सुनंदा कोल्हे, माजी उपमहापौर ज्योत्स्ना हिवराळे, माजी नगरसेविका पद्मा शिंदे, राधाबाई तळेकर, रजनी जोशी, कला बोरामणीकर, माजी नगरसेवक प्रदीप दत्त, शिवाजी गावडे, मधुकर शिंदे, संतोष शेंडगे, विनोद सोनवणे, विजय वाघमारे, शोभा मीटकर आदींसह जुन्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
मनपा निवडणुकीच्या तोंडावर आणि भाजपा, एमआयएमच्या आव्हानावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेने जुन्या शिवसैनिकांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पक्षाला नवचैतन्य यानिमित्त प्राप्त होत असले तरी यंगब्लड अजून इतर पक्षांकडेच आहे. जैस्वाल यांनी जुन्या सेना पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून बैठकीला बोलाविले होते. ४
जे शिवसैनिक प्रवाहाबाहेर गेले, ते परत आले आहेत. २० वर्षे जुन्या पदाधिकाऱ्यांनी लाठ्या- काठ्या खालल्या. घरांवर तुळशीपत्र ठेवले. आज बोलाविल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. भाजपा, एमआयएमसह इतर पक्ष शिवसेनेच्या विरोधात आहेत, असे आ. शिरसाट म्हणाले.