सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा थाटात

By Admin | Updated: August 28, 2014 00:01 IST2014-08-27T23:49:02+5:302014-08-28T00:01:38+5:30

औरंगाबाद : वॉर्ड क्र. ४५, रहेमानिया कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. खा. विजय दर्डा यांच्या निधीतून हे सभागृह उभारण्यात आले आहे.

In the celebration of the social hall, | सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा थाटात

सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा थाटात

औरंगाबाद : वॉर्ड क्र. ४५, रहेमानिया कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. खा. विजय दर्डा यांच्या निधीतून हे सभागृह उभारण्यात आले आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. वॉर्डाच्या नगरसेविका फिरदोस फातेमा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्वत: फिरदोस फातेमा व त्यांचे पती रमजानी खान यांच्या शेरशायरीयुक्त व माहितीपूर्ण भाषणांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले.
या भव्य सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त रहेमानिया कॉलनीत एक वेगळाच उत्साह संचारला होता. तेथील स्त्री-पुरुष नागरिकांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. सामाजिक सभागृहाच्या परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
यानिमित्ताने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वच जण उत्सुक झाले होते. त्यांनी सांगितले की, गेल्या पंधरा वर्षांत शहरात विविध ठिकाणी ६७ सामाजिक सभागृहांची उभारणी करण्यात आली. त्यापैकी हे एक मोठे सभागृह आहे. या भागातील नागरिकांना आता छोटे- मोठे कार्यक्रम पार पाडण्यासाठी हक्काचे सभागृह उभारून देता आले याचा मला निश्चितच आनंद आहे.
सरकारमध्ये विविध खात्यांच्या मंत्रिपदाची संधी मिळताच औरंगाबादच्या विकासाचा ध्यास घेऊन कशा प्र्रकारे काम करता आले, याचा थोडक्यात आढावाही मंत्रिमहोदयांनी यावेळी घेतला. नगरसेविका फिरदोस फातेमा यांनी, ‘राजेंद्र दर्डा हे पारसमणी असून त्यांनी मातीला स्पर्श केला, तर तिचेही सोने होते’ अशा शब्दांत गौरवोद्गार काढले व त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. नगरसेवक मुजिबोद्दीन, शहागंज ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इब्राहीमभय्या पटेल, नगरसेवक डॉ. जफरखान, शेख युसूफ, सुलेमानभाई, कैसर पटेल, लियाकत पठाण, सरताज पठाण, आरबाजखान, सिद्धार्थ वडमारे, अबू बकर, सा.बां.चे शाखा अभियंता एस.बी. वाळवेकर, उपअभियंता ए.डी. घेवारे आदींची मंचावर उपस्थिती होती. स्थानिक रहिवाशांची व त्यातही महिलांची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती.
अन्य कामांचा धडाका
वॉर्ड क्र. ८४, शिवनेरी कॉलनी गल्ली नं. १ मध्ये ड्रेनेजलाईन टाकणे, वॉर्ड क्र. ८२, भारतनगर येथील साईमंदिर व नूर मशीद परिसरात रस्त्याचे खडीकरण करणे, वॉर्ड क्र. ५७, भवानीनगर येथील संदीप थोरात यांच्या गल्ली नं. ३ ते दत्तनगरपर्यंत सिमेंट रस्त्याचे उद्घाटन, वॉर्ड क्र. ५५, कैसर कॉलनी येथील अतिकभाई यांच्या गॅरेजपासून मुस्तफा यांच्या घरापर्यंत ड्रेनेजलाईन टाकणे या कामाचे भूमिपूजन, वॉर्ड क्र. ४३, शरीफ कॉलनी येथील युनूस कॉलनी भागात सिमेंट रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन, वॉर्ड क्र. ४२, रोशनगेट येथील सिकंदर पार्क येथे सिमेंट रस्ता तयार करणे व वॉर्ड क्र. ४१ शहाबाजार येथील खुद्रस यांच्या घरापासून ते अहमदबेग यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच वॉर्ड क्र. ४१, शहाबाजार येथील काचीगुडा येथे सिमेंट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
शालेय शिक्षणमंत्री व औरंगाबाद पूर्वचे आमदार राजेंद्र दर्डा त्यांच्या प्रयत्नांनी व त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत झालेल्या या भूमिपूजन व उद्घाटन सोहळ्यास स्थानिक नागरिकांची प्रचंड उपस्थिती राहिली. कुठे रांगोळ्या काढून तर कुठे डोलीबाजाचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीत राजेंद्र दर्डा यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी दामूअण्णा शिंदे, राधाकृष्ण गायकवाड, राजाराम मोरे, शेख हबीब शेख छोटू कुरेशी, डॉ. जफरखान, बबन डिडोरे पाटील, सुनील त्रिभुवन, भीमराव हुस्के, डॉ. बाबासाहेब पैठणे, संगीत थोरात, फय्याज खान, बाबा अंथरूणकर, शेख कासीफ सरताज, इंजि. इफ्तेकार शेख, करिमुन्निसा जमील खान, शेख अब्दुल रशीद, शेख नजीर शेख बशीर, मतीन अहेमद, नगरसेवक मिर हिदायत अली, मुशाहीद सिद्दीकी आदींची यावेळी उपस्थिती होती.
तीन खुल्या रंगमंचांचे उद्घाटन, ज्येष्ठ नागरिकांना मान
वॉर्ड क्र. २६, गणेशनगर भागातील तीन खुल्या रंगमंचांचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. आता गणेशोत्सव जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर या खुल्या रंगमंचांना महत्त्व प्राप्त झाले. कारण अनेक सणवार व कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठीच हे रंगमंच उभारून देण्यात आले आहेत. न्यायालयीन सोसायटी, श्री सोसायटी व साईनगर येथे हे खुले रंगमंच उभारण्यात आले आहेत. त्या त्या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांना फीत कापण्याचा मान देण्यात आला.
यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर काम पूर्ण झाल्याचे समाधान झळकत होते. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळत होत्या. अनेकांनी राजेंद्र दर्डा यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. एकमेकांना पेढे भरवून नागरिक आपला आनंद व्यक्त करीत होते. मंत्रिपदाच्या विविध संधी मिळताच औरंगाबादच्या विकासाचा ध्यास घेऊन केलेल्या कामांचा संक्षिप्त आढावा राजेंद्र दर्डा यांनी यानिमित्ताने घेतला. हातांना काम महत्त्वाचे असल्याने डीएमआयसीमुळे २०२० पर्यंत अडीच लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
विलास राजहंस, नागनाथ स्वामी, राहुल पाटील, प्रवीण जाधव, रवी पाठक, निखिल पडूळ, रोहित स्वामी, भरत शिंदे, रितेश डक, आनंद देसाई, अविनाश मगरे, अ‍ॅड. डी.के. मुळे, कल्पना देसाई, संजीवन कुलकर्णी, रत्नाकर भावठाणकर, शिवाजीराव चाटे आदींसह महिलांची मोठ्या संख्येने खुल्या रंगमंचच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थिती होती.
ढोल-ताशांचा गजर आणि जणू यात्राच
वॉर्ड क्र. ५६, संजयनगर भागात विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एवढी प्रचंड गर्दी झाली होती. जणू यात्रेचे स्वरूपच प्राप्त झाले होते. विशेष हे की, कार्यकर्त्यांनी डोक्यावर तिरंगी टोप्या व गळ्यात तिरंगी गमछे घातले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, वातावरणात एक आगळे-वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.
४डॉ. शहा यांच्या दवाखान्याच्या बाजूच्या गल्लीत ड्रेनेजलाईन टाकणे, जिन्सी येथील गल्ली नं. ए-११ मध्ये सिमेंट रस्ता करणे, गल्ली नं. ए-७ मध्ये सिमेंट रस्ता करणे या कामांचे भूमिपूजन, गल्ली नं. ५-ए येथे सिमेंट रस्त्याचे उद्घाटन, गल्ली नं. ए-२ सिमेंट रस्त्याचे उद्घाटन व वॉर्ड क्र. ४५ रहेमानिया कॉलनी येथील यशोधरा कॉलनी येथून हबीबीया मशिदीपर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

Web Title: In the celebration of the social hall,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.