जिल्ह्यात नागपंचमी उत्साहात साजरी

By Admin | Updated: August 8, 2016 00:41 IST2016-08-08T00:33:49+5:302016-08-08T00:41:38+5:30

लातूर : शहरासह जिल्ह्यात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पंचमीनिमित्त वारुळ पूजनासह महादेव मंदिरात दर्शनासाठी महिलांची सकाळपासूनच

Celebrated in Nagpanchami enthusiasm in the district | जिल्ह्यात नागपंचमी उत्साहात साजरी

जिल्ह्यात नागपंचमी उत्साहात साजरी


लातूर : शहरासह जिल्ह्यात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पंचमीनिमित्त वारुळ पूजनासह महादेव मंदिरात दर्शनासाठी महिलांची सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. विशेष म्हणजे श्रावणातल्या पंचमीची सुहासिनींमध्ये ओढ असते. नव्या नवरीला माहेरची भेट घडविणारे सण म्हणून श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे.
नागपंचमीनिमित्त रविवारी शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांनी भुलईचा आनंद घेतला. पंचमीनिमित्त वारुळ पूजनासाठी महिलांची गर्दी होती. तर ठिकठिकाणच्या महादेव मंदिरातही महिला आणि अबालवृध्दांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावणातल्या सरींबरोबर येणाऱ्या सणांना विशेष महत्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण म्हणजे पवित्र महिना होय. याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, गौरी-गणपती, पोळा आदी कृषी संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या महत्वाच्या सणांची रेलचेल असते. विशेष म्हणजे, माहेरच्या लोकांची भेट घडविणाऱ्या या सणांची नव्या नवरीच्या मनात कायम ओढ असते.
शहरातील नाना-नानी पार्क, बाजार समितीतील गौरीशंकर मंदिर, अष्टविनायक मंदिर, प्रकाश नगर, औसा रोड रिंगरोड येथील महादेव-पार्वती मंदिरात दर्शनासाठी दिवसभर महिलांची गर्दी होती. ठिकठिकाणी वारुळ पूजन करुन नागपंचमी साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी झोके बांधण्यात आले होते.

Web Title: Celebrated in Nagpanchami enthusiasm in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.